फळांवरील रसायनं चिमुकल्यांसाठी घातक

By Admin | Updated: March 9, 2015 23:53 IST2015-03-09T21:35:30+5:302015-03-09T23:53:25+5:30

पालकांची जागृती महत्त्वाची : वातावरणातील बदलामुळेही मुलांच्या आजारपणात वाढ

Fertile chemicals are fatal to skin | फळांवरील रसायनं चिमुकल्यांसाठी घातक

फळांवरील रसायनं चिमुकल्यांसाठी घातक

सातारा : आहारात सर्वाधिक उंचीवर आणि पौष्टिक म्हणून फळांची गणना केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत शहरातील चिमुकल्यांना या पोषक फळांचाच त्रास होत असल्याचे चित्र अनेक दवाखान्यांमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुलांच्या शरीरात पोषक घटक जाणे गरजेचे वाटत असेल, तर फळाचे आवरण स्वच्छ धुऊन पुसून मगच ते मुलांना खायला द्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. गत सप्ताहात जोरदार पावसामुळे सर्वचजण अचंबित झाले. थंडी जाण्याचे आणि उन्हाळा येण्याचे संकेत ज्या दिवसांमध्ये मिळतात, त्या दिवसांत धुवाँधार पाऊस झाल्यामुळे सगळेच जण आश्चर्यचकित झाले. या पावसाने जसे शेतकऱ्यांचे नुकसान केले तसेच त्याने चिमुकल्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम केला. हवामानात होणारे बदल यंदा फळांना पोषक असे नव्हते. द्राक्ष फळ धरण्याच्या हंगामातही पावसाची वक्रदृष्टी या रोपांवर पडली होती. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला होता. पावसामुळे फळे गळून पडू नयेत आणि ती चांगली टिकावित, यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके आणि रसायनांचा प्रयोग शेतकऱ्यांना करावा लागला होता. त्यानंतर द्राक्षांवर पडलेल्या रोगामुळेही कीटकनाशके फवारणी करावी लागली होती. कधी नव्हे इतक्या प्रमाणात औषध आणि कीटकनाशकांची फवारणी झाल्यामुळे त्याचा थर द्राक्ष फळांवर पाहायला मिळतो. द्राक्षांचा पूर्ण घड पाहिला तर त्याच्या देठावर चहा पावडर सारखे कण पाहायला मिळतात. काही द्राक्षांवर फिकट पांढऱ्या रंगांचे आवरण पाहायला मिळत आहे. द्राक्षातील विविध प्रकारचे वाण आणि जाती असल्या तरी आपल्याकडे ‘सोनाक्का’ द्राक्षांना मागणी अधिक आहे. लांबड आणि जाड कातडीची ही द्राक्षे दिसायला अत्यंत आकर्षक असतात; पण औषधांच्या अतिफवारणीमुळे या द्राक्षांचाही नैसर्गिक रंग जाऊन त्यावर औषधांचा थर आल्याचे पाहायला मिळत आहे. घरातील कोणतीही फळे आली तरी ती स्वच्छ धुऊन मगच खायला देण्याचा दंडक आहे. पण आता त्यात सुधारणा करून द्राक्ष धुऊन आणि स्वच्छ पुसून मगच खायला देणे आवश्यक बनले आहे. लहानग्यांच्या शरीरात औषधे आणि कीटकनाशके जात असल्यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. अगदी पाणी पिले तरी ते उलटी वाटे बाहेर येत असल्याने पालकांत घबराट निर्माण झाली. साधारण दोन दिवस हा त्रास लहानग्यांना होत आहे. या दरम्यान चिमुकल्यांना दोन-चार चमचे त्यांना पचेल इतके पाणी द्यावे. यात ग्लुकोस, साखर, मीठ, लिंबू आदी दिल्यामुळे मुलांना शक्ती मिळते, असेही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. आपल्या चिमुरड्यांचा आग्रह असला तरी त्यांची समजूत काढून प्रकृतीस अयोग्य असलेले फळ देण्याचे टाळावे, त्यासाठी त्यांना पर्यायी फळे किंवा खाद्यपदार्थ द्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) स्वच्छ धुवा आणि पुसाही...! पूर्वी खूप कमी औषधे आणि कीटकनाशकांची फवारणी केली जायची. त्यामुळे फळं फक्त धुऊन खायला दिली तरी चालत होती. आता फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची आणि कीटकनाशकांची फवारणी केली जाते, तसेच त्यावर थर बसतो. त्यामुळे फळे केवळ धुऊन खाणे धोक्याचे ठरते. त्यामुळे अनेक वैद्यकीय तज्ज्ञ फळे धुऊन पुसून खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्याची खास पाणीदार फळे उन्हाळ्याची चाहूल लागते ती बाजारातील रसाळ फळे पाहूनच. निसर्गाने प्रत्येक ऋतुनुसार फळांची निर्मिती केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरिरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावत जाते. त्यामुळे या दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाणीदार रसाळ फळे पहायला मिळतात. कलिंगड, टरबुज, खरबुज, द्राक्ष, संत्री ही काही पाणीदार फळे याच दिवसांत येतात. त्यामुळे शरिरातील पाण्याची पातळी राखणे सहज शक्य होते. निम्मा उन्हाळा सरल्यानंतर आंबा बाजारात येतो. हा आंबाही या दिवसांत उपयुक्त ठरतो. माझ्या घरी कोणतेही फळ आणले तरी ते स्वच्छ धुऊन मगच मी माझ्या मुलाला खायला देते; पण काहीदा आपली नजर चुकवून ही मुलं स्वत:च्या हाताने फळ खातात. हात स्वच्छ धुतला नसेल तर त्यावरील किटाणूही या मुलांच्या पोटात जातात. गत सप्ताहात माझ्या मुलालाही उलटी आणि जुलाबाचा त्रास जाणवला. त्यामुळे त्याची पूर्ण शक्ती गेली. आता तो बरा आहे; पण काळजी ही घेतलीच पाहिजे. - मानसी कुलकर्णी, सातारा गेल्या आठवड्यात वातावरणात मोठा बदल झाला. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे तिन्ही ऋतू आपण सर्वांनीच दोन दिवसांत अनुभवले. वातावरणाीतल या बदलांचा परिणाम लगेचच चिमुकल्यांची प्रकृतीवर पाहायला मिळतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्दी, खोकला, उलटी, जुलाब या तक्रारी बाळांमध्ये पाहायला मिळाल्या. काही प्रमाणात शरीरात गेलेले औषधनाशकांमुळेही उलटी जुलाबाचा त्रास जाणवला. पालकांनी यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. - डॉ. भास्कर यादव, बालरोगतज्ज्ञ, सातारा फळांमध्ये सर्वाधिक कीटकनाशके आणि औषधे फवारणी होते ती द्राक्षांवर. त्यामुळे ज्यांच्या घरात दोन वर्षांखालील बाळं आहेत, त्यांनी द्राक्षे देऊ नयेत. उन्हाळ्यात नैसर्गिकदृष्ट्या पाण्याचा स्तर शरीरात टिकवता यावा, यासाठी भरपूर पाणी आणि गारवा असलेले कलिंगड, टरबूज, खरबूज, संत्री ही अन्य काही फळे उपलब्ध असतात. लहानग्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आणि पोषक द्रव्य घटक या फळांमधूनही त्यांना मिळू शकते. - जानकी वाघमारे, आहारतज्ज्ञ, सातारा

Web Title: Fertile chemicals are fatal to skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.