महिला तलाठी अटकेत
By Admin | Updated: January 21, 2015 23:57 IST2015-01-21T23:39:35+5:302015-01-21T23:57:27+5:30
माजगावात कारवाई : सात-बाऱ्यावर नावांसाठी लाचेची मागणी

महिला तलाठी अटकेत
सावंतवाडी : माजगाव येथील सोनबहावा घरकुल प्रकल्पाच्या विस्तारित सातबाऱ्यावर नावे चढविण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी भाग्यशीला व्यंकटराव शिंदे (वय ३०, रा. सर्वोदयनगर, सावंतवाडी) लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई माजगाव येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली. सावंतवाडी पोलीस ठाण्यात भाग्यशीला शिंदे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला असून, त्यांना तत्काळ अटक केली आहे. उद्या, गुरुवारी जिल्हा न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. ही माहिती लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव यांनी दिली. बाजी जयवंत सावंत (रा. सावंतवाडी) यांचे माजगाव येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. यातील १७ प्लॉटमध्ये सतराजणांची नावे सात-बारा उताऱ्यावर चढवायची होती. यासाठी ते आठ दिवसांपूर्वी माजगाव तलाठी कार्यालयात गेले होते. तलाठी भाग्यशीला शिंदे यांनी ही नावे चढविण्यासाठी ६८ हजार रुपयांची मागणी केली होती. प्रत्येक नावाला चार हजार याप्रमाणे ६८ हजार होणार असून, ६५ हजार रुपये द्यावेत, अशी तडजोडही शिंदे यांनी केली होती. यानंतर सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात ३५ हजार रुपये देण्याबाबत सावंत आणि तलाठी शिंदे यांच्यात ठरले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने माजगाव तलाठी कार्यालयात सापळा रचला. बाजी सावंत यांनी ठरल्याप्रमाणे हजार रुपयांच्या ३५ नोटा घेऊन ती रक्कम तलाठी शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यांनी ती कपाटात ठेवून लॉक केले, त्याक्षणीच लाचलुचपत विभागाने त्यांना ताब्यात घेतले. या पथकात जिल्हा पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव, पोलीस निरीक्षक मोतीराम वसावे, एल. डी. राणे, विलास कुंभार, डी. एस. कोरगावकर, मकसूद पिरजादे, नीलेश परब, प्सुमित देवळेकर, आशिष जामदार यांचा समावेश होता. (वार्ताहर)
शिंदे यांची सारवासारव
लाच घेताना कारवाई झाल्यानंतर तलाठी भाग्यशीला शिंदे यांनी ते दस्ताचे पैसे असल्याचे सांगत सारवासारव केली; मात्र दस्ताची एकूण रक्कम ३२,४९० रुपये एवढीच झाली. त्यांनी स्वीकारलेली ३५ हजारांची रक्कम न मोजता कपाटात ठेवली. तसेच याची कोणतीही पावती केली नव्हती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.