शाहूनी स्थापन केलेल्या समितीतील सत्कार स्मरणात राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:56+5:302021-07-19T04:16:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ ही राजर्षी शाहू महाराज यांनी वसवली. या समितीत ...

शाहूनी स्थापन केलेल्या समितीतील सत्कार स्मरणात राहील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ ही राजर्षी शाहू महाराज यांनी वसवली. या समितीत माझ्यासारख्या माणसाचा सत्कार होतो. हा सत्कार गोरगरीब व पददलितांचा सत्कार असून तो आपल्या स्मरणात कायम राहील, अशी भावना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली.
प्रा. कवाडे हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला दिलेल्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. प्रा. कवाडे म्हणाले, कोल्हापूर बाजार समितीची वाटचाल ही खऱ्या अर्थाने शाहूंच्या विचाराने सुरू आहे. त्यामुळेच आर्थिक दृष्ट्या समिती सक्षमपणे उभी असून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे.
समितीच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रा. कवाडे यांचा सत्कार के. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अशासकीय मंडळाचे सदस्य प्रा. जालंदर पाटील, डी. जी. भास्कर, अजित पाटील-परितेकर, सचिव जयवंत पाटील व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी : पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत अशासकीय मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले. प्रा. जालंदर पाटील, डी. जी. भास्कर, अजित पाटील-परितेकर, जयवंत पाटील आदी उपस्थित होते. (फोटो- १८०७२०२१-कोल-बाजार समिती)