कोरज येथे झाला असाही सत्कार..!

By Admin | Updated: July 31, 2014 23:30 IST2014-07-31T21:36:26+5:302014-07-31T23:30:42+5:30

दंडाची अशी शिक्षा : मुख्याध्यापकाने उचलला सत्काराचा खर्च

Felicitated at Koraj! | कोरज येथे झाला असाही सत्कार..!

कोरज येथे झाला असाही सत्कार..!

चंदगड : भारतीय परंपरेत अनादी काळापासून गुरूला महत्त्व आहे. महाभारत, रामायणात तर गुरू-शिष्यांच्या नात्यांची उदाहरणे सर्वश्रुत आहेत. पूर्वी विद्यार्थी गुरूला दैवत मानत होते. मात्र, आजच्या संगणकाच्या युगात गुरू-शिष्यांचे नाते हरवत चालले आहे. प्रथम संगणक, नंतर फेसबुक, ई-मेल आणि आता वॉटस अ‍ॅप आदी वापरांमुळे जग जवळ आले, पण या सर्वांमुळे माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. याचे उदाहरण कोजर येथील शाळेत पहावयाला मिळाले. शिक्षण क्षेत्रात सध्या हा सत्कार चर्चेचा विषय ठरला आहे.
कोरज (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी प्रतीक्षा उमाजी शिरगावकर हिने तालुकास्तरावरील सांस्कृतिक स्पर्धेत कथाकथन विभागात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
मात्र, या विद्यार्थिनीच्या यशाची बातमी स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाचे नाव नसल्याने त्यांनी त्या विद्यार्थिनीला जिल्हास्तरीय स्पर्धेला जाण्यासाठी जाणीवपूर्वक रोखले. तिला जिल्हास्तरीय स्पर्धेच्या तारखा न कळाल्याने तिला या स्पर्धेला मुकावे लागले. या विरोधात पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. शिक्षण विभागाच्या अहवालात या मुख्याध्यापकाने जाणीवपूर्वक जिल्हास्तरीय स्पर्धेच्या तारखा न कळविल्याचा आरोप अहवालात ठेवण्यात आल्याने ते कारवाईस पात्र असल्याचा सल्ला दिला होता. मात्र, या मुख्याध्यापकावर शिक्षण विभागाने कारवाई करण्याऐवजी वशिलेबाजी मध्यस्थातर्फे हे प्रकरण मिटवा-मिटवीसाठी जोरदार प्रयत्न झाले.शेवटी हे प्रकरण पं.स.च्या सभापती ज्योती पाटील यांच्या कोर्टात गेले. त्यांनीही या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याऐवजी या विद्यार्थिनीला प्रोत्साहन मिळावे यासाठी संबंधित मुख्याध्यापकाने तिचा सत्कार करावा व दंड म्हणून सत्काराचा खर्च उचलावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. मात्र, मुख्याध्यापकाने या खर्चाची जबाबदारी उचलण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शिक्षण विभागाने त्या मुख्याध्यापका बोलावून कारवाईची इशारा दिल्याने मुख्याध्यापकाने या सत्काराला होकार दिला. त्यानुसार काल कोरज येथे प्रतीक्षा शिरगावकर हिचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Felicitated at Koraj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.