‘शुल्क कपात’ जरा आधी व्हायला हवी होती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:06+5:302021-07-30T04:26:06+5:30
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन पध्दतीने शाळा सुरू झाल्या आहेत. या पध्दतीने शाळा सुरू असल्याने काही प्रमाणात शाळांच्या खर्चात ...

‘शुल्क कपात’ जरा आधी व्हायला हवी होती
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन पध्दतीने शाळा सुरू झाल्या आहेत. या पध्दतीने शाळा सुरू असल्याने काही प्रमाणात शाळांच्या खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे यंदा शंभर टक्के फी आकारण्यात येऊ नये. त्यामध्ये काही प्रमाणात सवलत द्यावी, अशी मागणी पालकांतून झाली होती. त्यावर खासगी शाळांमधील फीमध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय शासनाने बुधवारी जाहीर केला. त्यामुळे पालकांना दिलासा मिळणार आहे.
संस्थाचालक काय म्हणतात?
कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करून यावर्षी आम्ही शुल्कवाढ केलेली नाही. शासनाने १५ टक्के शुल्क कपातीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पालकांना दिलासा मिळणार आहे.
-महेश पोळ, अध्यक्ष, इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन
शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या फीमधून जमा होणाऱ्या रक्कमेतून खासगी शाळांचा सर्व खर्च चालतो. त्याचा विचार करून पालकांनी उर्वरित फी लवकर देऊन आम्हा संस्थाचालकांना सहकार्य करावे.
-डॉ. संदेश कचरे, अध्यक्ष, मॉडर्न शिक्षण संस्था
पालक काय म्हणतात?
कोरोनाच्या स्थितीत शाळांनी आम्हाला मदत केली. शुल्क कपातीचा निर्णय एप्रिल-मे दरम्यान झाला असता, तर अधिक पालकांना ते उपयुक्त ठरले असते. कारण, शुल्क परवडत नसल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेशित केले आहे. शुल्क कपातीच्या निर्णयाला थोडा उशिर झाला.
-संजय पटवर्धन, आपटेनगर
फीचा खर्च पेलत नसल्याने अनेक पालकांनी मुलांच्या शाळा बदलल्या आहे. शासनाने घेतलेला फी कपातीचा निर्णय चांगला, पण तो जरा आधी व्हायला हवा होता. या निर्णयाची शाळांनी तातडीने अंमलबजावणी करावी.
-युवराज पाटील, महे
चौकट
सरकारने भार उचलावा
सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने खासगी शाळा चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना राज्य सरकारने या १५ टक्के शुल्क कपातीच्या निर्णयातून सवलत द्यावी. तेथील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा भार सरकारने उचलावा, अशी मागणी इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे प्रदेश संयोजक ललित गांधी यांनी केली.
पॉईंटर
खासगी अनुदानित शाळा : ७६
खासगी विनाअनुदानित शाळा : ३४५
पूर्व प्राथमिक (प्रि-प्रायमरी) शुल्क : ६ हजार ते ६० हजार रुपये
प्राथमिक : १२ हजार ते १ लाख
माध्यमिक : १५ हजार ते दीड लाख