तरुणाईचा भन्नाट जल्लोष
By Admin | Updated: October 7, 2014 23:38 IST2014-10-07T23:17:01+5:302014-10-07T23:38:00+5:30
कोल्हापुरात रंगला जिल्हास्तरीय युवा महोत्सव

तरुणाईचा भन्नाट जल्लोष
कोल्हापूर : ठेका धरायला लावणारा लोकवाद्यवृंद, डोलविणारे लोकनृत्य, सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या लघुनाटिका, पथनाट्य तसेच ओसंडून वाहणारा उत्साह अशा भन्नाट वातावरणात आज, मंगळवारी ३४ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात दिवसभर तरुणाईने टेन्शन खल्लास असा जाम कल्ला केला. वादविवाद, एकांकिका, सुगम गायन, मूकनाट्य अशा सर्वच स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील तरुणाईच्या कौशल्याचे दर्शन घडले. आपल्या संघाला, स्पर्धकाला टाळ्या, शिट्ट्यांनी ‘चिअर-अप’ करणाऱ्या युवक-युवतींनी वातावरणात रंग भरला.
येथील राजाराम महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित या महोत्सवाला सुरुवात झाली. वादविवाद स्पर्धेत ‘हिंदी-चिनी भाईभाई : वास्तव की अभास’, ‘सोशल मीडिया’, आदी विषयांवर चांगलाच वाद रंगला. डॉ. बाळकृष्ण ग्रंथालय हॉलमधील लघुनाटिकेत २२ संघ सहभागी झाले. त्यांनी माळीण दुर्घटना, राजकारणाचे बदलते स्वरूप, व्यसनाधिनता आदी विषयांबाबत प्रबोधन केले. तबला, सूरपेटी, बासरीच्या साथीने सुगम गायनाची सूरमयी सफर घडली. त्यात प्रसाद पवार, प्रतिभा चौगुले, अभयकुमार पोतदार, स्नेहल पाटील, सोनाली जाधव, प्रियांका कदम, संकेत पोरे, पूजा पाटील आदींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुपारी अडीचनंतर महोत्सवातील स्पर्धांचा वेग वाढला. खुला मंच येथील लोकवाद्यवृंदाद्वारे भारतीय पारंपरिक वाद्यांतून सादरीकरण करत आठ संघांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना ठेका धरायला लावले. लोकनृत्यामध्ये लावणी, कोळीनृत्य, भांगडा आदींनी उपस्थितांना डोलविले. खुला मंचचा परिसर गर्दीने फुलला. वाद्यवृंद व लोकनृत्यास टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळत होती. यशवंतराव चव्हाण सभागृहात वीस संघांनी एकांकिका सादर केल्या.