अभ्यासक्रम बंद पडण्याची भीती
By Admin | Updated: December 2, 2014 23:35 IST2014-12-02T23:26:06+5:302014-12-02T23:35:20+5:30
पेच पुनर्रचित तंत्र अभ्यासक्रमाचा : ‘खर्च जास्त विद्यार्थी कमी’ची शक्यता

अभ्यासक्रम बंद पडण्याची भीती
प्रदीप शिंदे-कोल्हापूर -व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत पूर्वव्यवसायांचा नवीन अभ्यासक्रमात लेथ मशीन व मिलिंग मशीनवर जॉब हे विषय घेतले आहेत. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करायचा असेल, तर संस्थाचालकांना लाखो रुपयांची मशिनरी विकत घ्यावी लागणार असल्याने अनेक संस्था हा अभ्यासक्रम बंद करण्याचा विचार करतील. तसेच व्ही-३ या विषयात अभियांत्रिकी चित्रकला (इंजिनिअरिंग ड्रॉइंग) व माहिती तंत्रज्ञान या विषयांचा नवीन अभ्यासक्रमात समावेश नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी याकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘विद्यार्थी कमी आणि खर्च जास्त’, अशी स्थिती असल्याने हा अभ्यासक्रमच बंद पडेल.
नवीन अभ्यासक्रमात व्ही-२ या विषयामध्ये टर्निंग, मिलिंग यासारखा अभ्यासक्रम समाविष्ट केल्याने या विषयासाठी लेथ मशीन व मिलिंग मशीन संस्थाचालकांना विकत घ्यावी लागणार असल्याने त्यांना लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच या यंत्रसामग्रीसाठी नवीन जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत अनेक संस्थाचालक विचार करतील. त्याचसोबत व्ही-३ या विषयात अभियांत्रिकी चित्रकला (इंजिनिअरिंग ड्रॉइंग) व माहिती तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे. मात्र, अभियांत्रिकी चित्रकला हा विषय अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया असल्यामुळे पुढील अभ्यासक्रम सोपा जावा यासाठी अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळत होते; मात्र नवीन अभ्यासक्रमात याचा समावेश नसल्याने अनेक विद्यार्थी यापासून दूर जातील. विद्यार्थी नसल्याने संस्थाचालकांना हा अभ्यासक्रम बंद करावा लागेल. अपुऱ्या सुविधा असताना नवा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे विद्यार्थ्यांना अर्धवट ज्ञान दिल्यासारखे आहे. यातून नुसते कामगार तयार होतील, अशी भीती अशासकीय तांत्रिक, शिक्षण कर्मचारी महासंघातून व्यक्त होते आहे.
तंत्र शिक्षणामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करणे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र, या अभ्यासक्रमामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन यंत्रसामग्री संस्थाचालकांना स्वबळावर घेणे शक्य होणार नाही. यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक होणार आहे. १९९८ ते १९९९ पासून वेतनेतर अनुदान शासनाने बंद केले आहे. त्यामुळे कोणत्याही शिक्षण संस्थांना एवढी गुंतवणूक करणे शक्य होणार नाही. अभ्यासक्रमाची निर्मिती करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा, अन्यथा अनेक शिक्षण संस्थांमधून हा अभ्यासक्रम बंद होईल.
-प्रा. जयंत असगावकर, सचिव, कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ