इनामी जमिनीवरील बांधकामांना दंड केल्याने संताप
By Admin | Updated: November 25, 2015 00:44 IST2015-11-24T23:44:49+5:302015-11-25T00:44:10+5:30
नागरी निवारा संघटना : आंदोलनाचा इशारा; दंड वसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी

इनामी जमिनीवरील बांधकामांना दंड केल्याने संताप
कोल्हापूर : शहर परिसरातील इनामी जमिनीवर झालेल्या सर्व बांधकामांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या महसूल विभागाच्या निर्णयाविरुद्ध सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील सुमारे १२५० मिळकतधारकांना अशा भरमसाठ दंडाच्या नोटिसा लागू झाल्याने या मिळकतधारकांचे धाबे दणाणले आहे. दंड वसुलीला तत्काळ स्थगिती देण्यात यावी अन्यथा त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरी निवारा संघटनेने दिला आहे.
गुंठेवारी कायद्यात दुरुस्ती झाल्याने गुंठेवारीतील जमीन खरेदी-विक्रीला परवानगी मिळाली. आता खालसा आणि इनाम जमिनीवरील बांधकामेही नियमित करून देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारशी पत्रव्यवहार होत आहे. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करून इनामी जमिनीवरील बांधकामांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा लागू करण्यास सुरुवात झाली आहे. तहसीलदार कार्यालयामार्फत आतापर्यंत सुमारे १२५० मिळकतधारकांना नोटिसा लागू झाल्या आहेत. अव्वाच्या सव्वा दंडाच्या नोटिसा लागू झाल्यामुळे मिळकतधारकांत अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला आहे.
एका मिळकतधारकांचा अकराशे स्क्वेअर फुटांचा प्लॉट आहे. त्यावर करण्यात आलेल्या बांधकामाबद्दल त्यांना तब्बल ३ लाख १८ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे, असे नागरी निवारा संघटनेचे चंद्रकांत यादव यांनी सांगितले. हा दंड भरमसाठ आहे. तो मिळकतधारकांना परवडणारा नाही, असे यादव यांनी सांगितले.
सोमवारी संघटनेचे एक शिष्टमंडळ करवीरचे प्रांत प्रशांत पाटील यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा करताना दंडाच्या वसुलीस प्रथम स्थगिती द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बांधकामासाठी आकारलेल्या पंचवीस टक्क्यांची सवलत देण्यात यावी तसेच सवलतीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शहरातील जमादार कॉलनी, सासने कॉलनी, यादवनगर, सुभाषनगर परिसरातील मिळकतधारकांचे धाबे दणाणले आहे. कारवाईच्या विरोधात लवकरच बैठक घेऊन आंदोलन छेडण्यात येणार आहे, तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून त्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
शहरात १ लाख ४२ हजार मिळकती.
त्यापैकी केवळ ६५ ते ७० हजार मिळकतींचीच प्रॉपर्टी कार्डवर नोंद.
बाकीच्या मिळकती ७/१२ पत्रकी नोंद.
३० ते ३५ हजार मिळकती इनामी जमिनीवरील असण्याची शक्यता.
१२५० मिळकतधारकांना महसूलच्या नोटिसा
इनामी जमिनीवर बांधकामे किती याची नेमकी माहिती उपलब्ध नाही.