पोलिसांचा धाक कमी होतोय
By Admin | Updated: December 19, 2014 00:24 IST2014-12-18T21:54:55+5:302014-12-19T00:24:51+5:30
पोलीस करतात तरी काय ? : इचलकरंजीत चोऱ्यांसह वाटमारीचे प्रकार वाढले

पोलिसांचा धाक कमी होतोय
अतुल आंबी - इचलकरंजी --येथे सहायक पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक, वीस पोलीस अधिकारी आणि सुमारे ३०० पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. तरी शहर आणि परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, वाटमारी, घरफोड्या यासह आता पोलिसांच्या ताब्यातून आरोपीचे पलायन अशा घडामोडींमुळे पोलीस नेमके करतात तरी काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत
आहे. यावरून पोलिसांचा धाक
कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शहरात गेल्या सहा महिन्यांपासून चोऱ्या, घरफोड्या करून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ‘धूम स्टाईल’ने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार तर दिवसाढवळ्या सर्रास सुरू आहेत. आता यामध्ये वाढ होत वाटमारी, लूट आणि वेळप्रसंगी मारहाण, चाकूहल्ला, असे प्रकार घडत आहेत.
खंडणीसाठी धमक्या देऊन मारहाण करून वसुली करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार येत नसल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. तर कित्येक प्रकरणांत मिटवा-मिटवी करून किरकोळ स्वरूपाची तक्रार दाखल करून घेतली जाते. त्यामुळे खंडणी मागायला येणाऱ्या गावगुंडांना काही तरी देऊन ‘तडजोड’ करण्याशिवाय व्यापारी, उद्योजकांकडे पर्याय राहिला नाही.
गेल्या काही दिवसांपासून कामगारांना अडवून त्यांच्याकडून मोबाईल, पगाराची रक्कम काढून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत काही तक्रारी पोलीस ठाण्यात नोंद झाल्या, तर काहींनी उपयोग होत नाही म्हणून सोडून दिले आहे.
सोमवारी रात्रीही असाच प्रकार सोनाराच्या बाबतीत घडला. ते दुकान बंद करून चार तोळे दागिने व साठ हजार रुपये रोख रक्कम घेऊन आपल्या गावी परत जात असताना तारदाळ-निमशिरगाव मार्गावर त्यांना अडवून हातातील बॅग काढून घेण्याचा प्रयत्न वाटमारी करणाऱ्या गुंडांनी केला. यावेळी त्याला विरोध करताना या गावगुंडांनी त्यांच्यावर चाकूहल्ला करून सराफ व्यावसायिकाकडील बॅग त्यांनी लुटून नेली.
मागील आठवड्यात यंत्रमाग कामगाराला अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल काढून घेण्यात आला. त्यावेळी त्या कामगाराने आपल्यासह याआधी चार कामगारांना अशा प्रकारे अडवून मोबाईल व रोख रक्कम काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. औद्योगिक वसाहतीतही एका मेंडिंग एजंटाला कारखान्यात गाठून एका टोळक्याने खंडणीची मागणी केली. त्यावेळीही पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल न करता वाटमारीचा गुन्हा नोंद केला. असे प्रकार शहर व परिसरात नेहमी घडत असल्याने नागरिकांसह व्यापारी, उद्योजकांत चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
पोलीस दलाची गुंडांवर दहशत निर्माण होण्याऐवजी गुंडांचीच दहशत निर्माण होत असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून पोलीस दलाच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अशा गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
१८ ते २२ वयोगटांतील तरुणांचा समावेश
शहर व परिसरात झालेल्या घरफोड्या, चोऱ्या अशा प्रकरणांत सापडलेले चोरटे अल्पवयीन किंवा १८ ते २२ या वयोगटांतील असल्याचे दिसून आले.
चोरी, घरफोडी, वाटमारी करून, पैसा मिळवून चैनी करण्याची सवय या युवा वर्गाला लागल्याचे
दिसत आहे.
त्यामुळे सामाजिक संस्था, पोलीस खाते यांच्यासह पालक, शिक्षक यांनी तरुणांना मार्गदर्शन व प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.