जमिनी पडीक राहण्याची भीती
By Admin | Updated: July 5, 2014 00:01 IST2014-07-04T22:56:08+5:302014-07-05T00:01:58+5:30
जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव : शेतकरी हतबल, भातशेती सोडून देण्याचा निर्णय

जमिनी पडीक राहण्याची भीती
महेश चव्हाण : ओटवणे
जून महिना कोरडा गेला, तरीही जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोर धरल्याने सह्याद्री पट्ट्यातील भातशेतीची कामे लगबगीने सुरू झाली आहेत. मात्र, ओटवणे दशक्रोशीतील सह्याद्री डोंगररांगांच्या तळाच्या जमिनी पडीकच राहणार आहेत. वन्यप्राण्यांच्या अतिक्रमणामुळे या पट्ट्यातील भातशेती सोडून देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी सह्याद्री डोंगरपट्ट्याच्या तळातील तसेच डोंगराळ जमीन पडीक दिसणार आहे.
ओटवणे दशक्रोशीतील संभावित गावाची आर्थिक उलाढाल ही भातशेतीवरच अवलंबून आहे. भातशेती हे येथील प्रमुख पीक आहे. मात्र, येत्या काही वर्षांमध्ये वन्यप्राण्यांनी भातशेतीवर अतिक्रमण करून अतोनात नुकसानी चालविल्याने शेतकऱ्यांना शेती करणे न परवडणारे झाले आहे.
हत्ती, गव्यांचा कळप, रानगायी, डुक्कर, माकडे आदी प्राणी डोंगराळ भागातील भातशेती फस्त करू लागले आहेत.
हे प्राणी पेरणीपासून उत्पादनापर्यंत प्रत्येक टप्प्यात पिकांवर तुटून पडत असल्याने भातशेती फस्त करण्याबरोबरच त्याची नुकसानीही मोठ्या प्रमाणात करतात. यातील काही प्राणी हिंंस्त्र असल्याने त्यांचा प्रतिकार करणे ग्रामस्थांना शक्य होत नाहीत.
तसेच तसा प्रयत्न केल्यास हे प्राणी हल्लाही करण्याची भीती असल्याने ग्रामस्थांना होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पहावे लागत आहे. डोंगरभागात भातशेती केल्यास त्यांची पेरणीपासूनच रखवाली करावी लागते.