दोष पुरुषाचा, परंतु मानसिक छळ मात्र बाईचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:56+5:302021-08-21T04:29:56+5:30
कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ ...

दोष पुरुषाचा, परंतु मानसिक छळ मात्र बाईचा
कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ करत असल्याचे वास्तव आहे. तुला अजून दिवस गेले नाहीत का, म्हणून सासरी व माहेरीही तिचीच परीक्षा घेतली जाते. पुरुषाला असे कोण कधी विचारात नाही. मूल होण्यात पुरुषाची जबाबदारी जास्त असल्याचे वैद्यकीय कारण कोल्हापुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंजुळा पिशवीकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.
सोनाळी (ता.कागल) येथील सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. त्यातील संशयित आरोपीस लग्नाला पंधरा वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते, असे पुढे आले आहे. मुलाच्या खुनाच्या कारणांशी हे कारण जोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने मूल न होण्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेतले.
१.मूल होण्यासाठी पती व पत्नीचा वाटा समान ५० टक्के असतो. किंबहुना पुरुषाची जबाबदारी मूल होण्यात जास्त असते. कारण त्याच्या शरीरात पुुरेशा शुक्राणुंची निर्मिती न झाल्यास मूल होण्यात अडचणी येतात.
२.मूल होत नाही म्हटल्यावर आता सर्व दोष पत्नी नावाच्या बाईला दिला जातो. लग्न झाल्यावर वर्षभरानंतर दिवस गेले नाहीत तर त्याबद्दलचा जाब हा पुरुषाला कधीच विचारला जात नाही. तो बाईलाच विचारला जातो.
३. पत्नीच्या शुक्राणुंची तपासणी करण्यासाठी किमान २० हजारांहून जास्त खर्च येतो. त्यासाठी छोटी शस्त्रक्रियाही करावी लागते. याउलट पुरुषाची शुक्रजंतू सुलभ असते. त्यामुळे पुरुषाची तपासणी करणे अधिक गरजेचे असते. त्याच्या शरीरात शुक्रजंतू निर्मितीस अडचणी असतील तर मूल होण्यास विलंब होतो.
४.पुरुषांमध्ये मोबाइलचा वाढता वापर, धूम्रपान, सतत ताणतणाव यामुळे शुक्रजंतू तयार होण्यात अडचणी येतात. तयार झाले तरी ते प्रजननयोग्य नसतात. त्यामुळे गर्भधारणा होत नाही.
५.महिलांमध्ये एक्स एक्स असे जिन्स असतात व पुरुषांमध्ये एक्सवाय असे जिन्स असतात. पुरुष व महिलेतील एक्स-एक्स जिन्स एकत्र आले तर मुलगी जन्माला येते व महिलेतील एक्स व पुरुषांतील वाय जिन्सचे मिलन झाल्यानंतर मुलगा जन्माला येतो. म्हणजे येथेही जन्माला येणारे अपत्य मुलगा की मुलगी होणार, हे सुद्धा पुरुषाच्या जिन्सवर ठरते; परंतु मुलगी झाली म्हणून समाज मात्र बाईचाच छळ करतो, करत आला आहे.
-------------
अनेक घरात हुंदके...
सोनाळीतील वरद पाटील या मुलाचा खून झाल्याचे वृत्त शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावरून व्हायरल होताच कित्येकांना त्याचा मानसिक धक्का बसला. अनेक महिलांना अक्षरश: रडू कोसळले. कारण काहीही असले तरी या अत्यंत गोंडस बाळाने तुझे काय वाईट केले होते रे निर्दयी राक्षसा, अशी संतप्त भावना समाजातून व्यक्त झाली.