इचलकरंजीत लाच घेताना फौजदारास अटक
By Admin | Updated: August 8, 2014 00:51 IST2014-08-08T00:49:34+5:302014-08-08T00:51:14+5:30
‘लाचलुचपत’ची कारवाई : चार हजार रुपये घेतले

इचलकरंजीत लाच घेताना फौजदारास अटक
इचलकरंजी : गुन्ह्यात जप्त केलेली मारुती कार सोडविण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील फौजदार मेहबूब सुफेसनो मुल्ला (रा. लिंबीचिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, गुरुवारी रंगेहात पकडले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. सव्वा महिन्यात तीन पोलीस लाच घेताना सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, तीन महिन्यांपूर्वी वरातीत नाचताना झालेल्या मारहाणप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यामध्ये दीपक काशिनाथ कित्तुरे (वय ३२, रा. जवाहरनगर) याची मारुती कार (एमएच ०९ ई २८२९) जप्त करण्यात
आली होती. ही गाडी कोर्टाकडून सोडवून घेण्यासाठी कोर्टाने तपासी अधिकारी मुल्ला याच्याकडे म्हणणे मागितले होते. गाडी परत मिळण्यासाठी तुझ्या बाजूने म्हणणे देतो, असे सांगून मुल्ला याने कित्तुरे याच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले.
कित्तुरे यांनी याबाबत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षिका पद्मा कदम यांच्या पथकाने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचून चार हजार रुपये स्वीकारताना मुल्ला यास रंगेहात पकडले. या कारवाईत उदय पाटील, अमर भोसले, संजय गुरव, जितेंद्र शिंदे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)
सव्वा महिन्यात तिघे जाळ्यात
इचलकरंजीत अवघ्या सव्वा महिन्यात तीन पोलीस लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. यामध्ये
१ जुलैला शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील हवालदार हरिश्चंद्र बुरटे, २४ जुलैला वाहतूक पोलीस आझाद गडकरी आणि आज शिवाजीनगरमधीलच फौजदार मेहबूब मुल्ला यांचा समावेश आहे. या सलगच्या कारवाईमुळे जिल्ह्यातील पोलीस दलाबरोबरच शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लाचखोरीची वाळवी
इचलकरंजीला लाचखोरीची वाळवी लागत आहे. याबाबत ‘लोकमत’मध्ये २८ जुलैला वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आठ दिवसांतच पुन्हा एक पोलीस अधिकारी कारवाईत सापडला.