मुलीस विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:06 IST2017-08-21T00:06:56+5:302017-08-21T00:06:56+5:30

मुलीस विहिरीत ढकलून पित्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची/पेठवडगाव : लाटवडे (ता. हातकणंगले) येथे वेडाच्या भरात वडिलाने स्वत:च्या मुलीस विहिरीत ढकलून देऊन स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. प्रकाश श्रीपती यादव (वय ३७) व परिती (६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
लाटवडे येथे भादोलेकडे जाणाºया रस्त्याजवळ प्रकाश यादवचे घर आहे. प्रकाश गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी पत्नी कोल्हापूर येथे ब्यूटी पार्लरच्या प्रशिक्षणासाठी गेली, तर आई कामानिमित्त गावात गेली असता घरात कोणी नाही हे पाहून प्रकाशने घराजवळील स्वत:च्या विहिरीत परितीस ढकलून दिले. त्यानंतर घरात जाऊन तुळईला साडीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली.
मोठा भाऊ चंद्रकांत हा भादोले येथून आपल्या पत्नीला नेण्यासाठी आला. त्यावेळेस घराला पुढील व मागील दाराला कडी असल्याचे दिसले. त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याने प्रकाश यास आवाज दिला, पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मागील बाजूचे दार तोडून त्याने आत प्रवेश केला. प्रकाशने गळफास लावल्याचे आढळले. परितीही घरात न आढळल्याने चंद्रकांतने विहिरीत पाहिले. मोटारीने पाणी उपसल्यानंतर परितीचा मृतदेह दिसला. दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन भादोले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केले. घटनेची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. तपास पोलीस निरीक्षक यशवंत गवारी करीत आहेत.
..अन् डोळे पाणावले
प्रकाश पेठवडगाव येथील सलून दुकानात काम करीत होता. परिती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होती. तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर सुटी असतानाही तिने शाळेचा गणवेश परिधान केल्याचे दिसल्याने सर्वांचेच डोळे पाणावले.