‘महामंडळ’समोर उपोषणाचा इशारा
By Admin | Updated: November 30, 2014 23:56 IST2014-11-30T23:19:04+5:302014-11-30T23:56:25+5:30
भालचंद्र कुलकर्णी : चित्रपट महामंडळ बरखास्त करण्याची मागणी

‘महामंडळ’समोर उपोषणाचा इशारा
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या इतिहासात पहिल्यादांच प्रसाद सुर्वे यांच्या रूपाने राजकीय हस्तक्षेप झाला. महामंडळात मनमानी पद्धतीने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. चित्रपट महामंडळ भ्रष्टाचारी संचालकांच्या विळख्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाची विद्यमान कार्यकारिणी त्वरित बरखास्त करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा १ जानेवारीपासून महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीचे कार्याध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. कुलकर्णी म्हणाले, महामंडळातील अनेक संचालकांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. प्रसाद सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंजुरी नसताना सुमारे ५८ लाख रुपयांचा चुराडा केला. दोन महिन्यांनी खर्चास मंजुरी घेतली. फेर लेखापरीक्षणात उल्लेख असलेल्या रकमांची व हिशेबांची मुदत देऊनही उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, प्रमुख कार्यवाह सुभाष भुरके, विजय पाटकर, प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर यांनी का पूर्तता केली नाही, १० नोव्हेंबर २०१३ रोजीच्या कार्यकारिणीत अष्टेकर, सुर्वे यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा ठराव करण्यात आला पण सुर्वेंचे सभासदत्व रद्द झालेले नाही. भालचंद्र कुलकर्णी व निर्माते मेघराज राजेभोसले व काही माजी संचालकांनी महामंडळातील भ्रष्टाचाराबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबत विद्यमान कार्यकारिणी मूग गिळून गप्प बसली आहे.न्यायालयीन खर्च व्यक्तिगत करणे अपेक्षित असताना महामंडळावर टाकला जात आहे. मिलिंद अष्टेकर यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्णानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. विजय कोंडके यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संचालकावर कायदेशीर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे.
यावेळी मेघराज राजेभोसले, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, छाया सांगावकर आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )
प्रमुख आक्षेप....
मंजुरी नसताना ५८ लाखांचा खर्च, दोन महिन्याने मंजुरी घेतली.
महामंडळाची बदनामी करणाऱ्या सुर्वेंवर कारवाई का नाही?
विद्यमान कार्यकारिणी ठोस कारवाई करत नाही.
महामंडळात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार.