इचलकरंजीत घरकुल मिळण्यासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:03 IST2016-09-19T23:54:02+5:302016-09-20T00:03:13+5:30
नगरपालिकेसमोर उपोषण : आठवडाभरात घरकुले वितरित करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

इचलकरंजीत घरकुल मिळण्यासाठी उपोषण
इचलकरंजी : येथील जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेली ४४४ घरकुले वितरित करावीत, या मागणीसाठी झोपडपट्टीतील बारा नागरिकांनी सोमवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. या प्रश्नाबाबत नगरपालिकेत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मक्तेदाराचा १ कोटी ४ लाखांचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, घरकुलांच्या वितरणाबाबत नगरपालिकेकडून वारंवार आश्वासने देऊन ती पाळली जात नाहीत, याच्या निषेधार्थ नागरिकांनी उपोषण सुरूच ठेवले.
केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. ही घरकुले तयार असूनही लाभार्थींना घरे मिळत नसल्याबद्दल झोपडपट्टीवासीयांमध्ये संताप आहे. घरकुले ताबडतोब द्यावीत यासाठी झोपडपट्टी- वासीयांकडून गेले सहा महिनेहून अधिक काळ नगरपालिकेकडे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासन त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. म्हणून सोमवारी झोपडपट्टीतील अकरा नागरिकांनी नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपनगराध्यक्ष महावीर जैन, नगरसेवक सुनील पाटील, अजित जाधव, विठ्ठल चोपडे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, आदींबरोबर लाभार्थींच्या- वतीने नाना पारडे, सतीश टेकाळे, संजय गवळी, संजय निकाळजे, आदींनी चर्चा केली. चर्चेवेळी नगरपालिका वारंवार आश्वासन देऊन ते पूर्ण करत नसल्याबद्दल शिष्टमंडळातील सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ व नगर अभियंता चौधरी यांना अनेक
प्रश्न विचारून भंडावून सोडले.
यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, नंतर परिस्थिती निवळली.
तयार असलेल्या घरकुलांना नळ पाणीपुरवठा जोडणी, वीज जोडणी, भुयारी गटार योजनेबरोबर जोडणी, आदी अंतिम टप्प्यातील कामे ताबडतोब करून द्यावीत आणि लाभार्थींना घरकुलांचे वाटप करावे; अन्यथा आता लाभार्थ्यांचा संयम तुटत चालला असून, ते इमारतींचा घुसून ताबा घेतील, असा इशारा या चर्चेमध्ये आंदोलकांनी दिला. यावर मक्तेदारास धनादेश देण्याची त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. तसेच घरकुलांच्या अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. शेवटी या प्रश्नाबाबत शुक्रवारी (२३ सप्टेंबर) मक्तेदाराबरोबर सर्वांची बैठक घेण्याचा आणि २६ सप्टेंबरला लाभार्थींची यादी निश्चित करून घरांना क्रमांक देण्याचे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)
मक्तेदाराच्या दुर्लक्षामुळे घरकुल पडून
केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. यापैकी १४४ घरकुलांच्या इमारती बांधून पूर्णत्वास आल्या आहेत. मात्र, मक्तेदाराचे बिल दिले नसल्यामुळे त्याने इमारतींची अंतिम कामे केलेली नाहीत.