खत दरवाढीविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:30+5:302021-05-19T04:23:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात ...

खत दरवाढीविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला धक्का देतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिला.
खतांच्या दरवाढीविरोधात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराणा प्रताप चौकात निदर्शने केली. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅससह जीवनाश्यवक वस्तूंच्या दरात मोठी वाढ केली. हे कमी की काय म्हणून रासायनिक खतांच्या दरात तब्बल ४० टक्के वाढ करून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले.
यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, युवक शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, प्रसाद उगवे, युवराज वारके, निहाल कलावंत, सुहास साळोखे, संजय कुराडे, संजय पडवळे, रमेश पोवार, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : रासायनिक खत दरवाढीविरोधात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराणा प्रताप चौकात निदर्शने केली. यावेळी मधुकर जांभळे, आदिल फरास, अनिल साळोखे, आर. के. पोवार, ए. वाय. पाटील, भय्या माने आदी उपस्थित होते. (फोटो-१८०५२०२०१-कोल-एनसीपी)