शेतकऱ्यांनी गुणवत्ता, मार्केटिंगचे तंत्र शिकावे
By Admin | Updated: December 26, 2014 23:47 IST2014-12-26T23:04:49+5:302014-12-26T23:47:02+5:30
बसवराज मास्तोळी : केंद्रीय वखार महामंडळाची कार्यशाळा

शेतकऱ्यांनी गुणवत्ता, मार्केटिंगचे तंत्र शिकावे
कोल्हापूर : केवळ शेतीमालाचे उत्पादन केले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही. त्या मालाची गुणवत्ता राखत मार्केटिंगचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांनी केले.
केंद्रीय वखार महामंडळ, शाखा कोल्हापूरच्या वतीने आयोजित शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ‘पीक कापणीनंतर अन्नधान्याची शास्त्रोक्त साठवणूक’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मास्तोळी म्हणाले, बाजारात येणारा शेतीमाल हा किमान ९५ टक्के गुणवत्तापूर्ण पाहिजेच. शेतीमाल असल्याने त्यामध्ये काडी-कचरा, दुय्यम माल असतो; पण त्याचे प्रमाणे ३ ते ३.५ टक्क्यांपेक्षा अधिक राहता कामा नये. याचे प्रमाण थोडे जरी वाढले तरी तेच कारण पुढे करत व्यापारी दर पाडतात. त्यामुळे शेतीमाल बाजारात आणताना त्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. आजपर्यंत डोळेझाकपणे आपण शेती केली; पण आता जागरूकतेने पुढे गेले पाहिजे. शेतीमालाची गुणवत्ता राखत असताना त्याची ग्रेडिंगनुसार विक्री गरजेची आहे. ग्रेडिंगबरोबर पॅकिंगही महत्त्वाचे आहे. विक्री व्यवस्थेत केवळ शेतकऱ्यांनाच आपल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. उत्पादन व मागणी यावरच शेतीमालाचे दर अवलंबून असल्याने बाजार पाहूनच शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी बाहेर काढला पाहिजे, असेही मास्तोळी यांनी सांगितले. वखार महामंडळाचे शाखाप्रबंधक एम. एस. मेटील यांनी ‘पीक कापणीनंतरची साठवणूक’ याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुरेश मगदूम, एस. के. पोवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
बाजार समित्या उद्देशापासून बाजूला!
मार्केटमध्ये आणलेल्या मालाची चाळण व वाळवण्यासाठी आवश्यक साहित्य बाजार समितीने उपलब्ध करून द्यायचे आहे. मालाला योग्य भाव नाही मिळाला तर त्याची साठवणूक करण्यासाठी गोडावून व शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सोय कायद्याने बंधनकारक आहे; पण तसे होताना दिसत नसल्याची टीका मास्तोळी यांनी केली.
मालतारण कर्ज योजना
मान्यताप्राप्त गोडावूनमध्ये माल ठेवल्यास त्यावर कोणतीही बॅँक ७ टक्के सरळ व्याजाने मालाच्या एकूण किमतीच्या ७० टक्के कर्ज देते.
मान्यताप्राप्त नसलेल्या गोडावूनमधील मालावर
१३ टक्के व्याजदराने ७० टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते.