शेतकरी संघटनांचा आलेख ढासळतोय
By Admin | Updated: July 19, 2015 23:38 IST2015-07-19T23:18:33+5:302015-07-19T23:38:26+5:30
नेत्यांची लोकप्रियता घटली : जयंत पाटील यांच्यासह साखरसम्राटांची ताकद भक्कम

शेतकरी संघटनांचा आलेख ढासळतोय
अशोक पाटील - इस्लामपूर -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख ढासळू लागला आहे. सत्तेवर आल्यानंतर राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी काही करतील, या अपेक्षेतून जनतेने त्यांना निवडून दिले. पण यंदा कोणत्याही शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी आक्रमक असे आंदोलन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षाही कमी पैसे मिळाले आहेत. उलट पुढील हंगामात साखर कारखाने १२०० रुपयेही दर देऊ शकणार नसल्याचा स्फोट माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. एकाअर्थी हे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आव्हानच दिले आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाशी संबंधित असलेल्या बहुतांशी सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत असून, ते मंत्रीपदाच्या लालसेपोटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत असल्याचा आरोप साखरसम्राट करू लागले आहेत. यामध्ये तथ्यही असल्याने त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. एकूणच शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला असल्याची तीव्र भावना परिसरात उमटत आहे.
जयंत पाटील यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखरसम्राटांनीही एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. खुद्द साखराळे हद्दीत असलेल्या राजारामबापू सह. साखर कारखान्यानेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यावर साखराळे गावचे सुपुत्र व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ब्र शब्दही काढण्यास तयार नाहीत. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रघुनाथदादा आता प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन केवळ प्रसिध्दी करून घेण्याचे काम करीत आहेत, अशी चर्चा ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.
जयंतरावांची लोकप्रियता वाढली..!
ंआमदार जयंत पाटील मंत्री असताना त्यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असे. मात्र तेव्हा असलेल्या गर्दीपेक्षाही आता आमदार असतानाची गर्दी जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात तेव्हा सुरक्षा पथक, प्रोटोकॉलच्या मर्यादाही होत्या. सध्या कार्यकर्त्यांसाठी जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील केंद्रबिंदू ठरत आहेत. काही ठिकाणी विरोधकांच्या हातात हात घालून त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी सर्व विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांच्या भावनेचा बाजार करून काही काळ यशस्वी झालेले शेतकरी संघटनेचे हे नेते भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत. पक्षाने त्यांना दाखवलेल्या मंत्रिपदाच्या गाजराला भुलून ते शेतकऱ्यांनाच विसरले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेल्या ऊस दराच्या प्रश्नालाही या नेत्यांनी बगल दिली आहे. त्यामुळे काही कारखान्यांनी उसाचे पहिले बिलही दिलेले नाही. यामध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या शिवाजी केन व वारणा कारखान्याचाही समावेश आहे.
- बी. जी. पाटील,
संघटक, बळीराजा शेतकरी संघटना.