शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे
By Admin | Updated: August 8, 2014 00:44 IST2014-08-07T22:05:22+5:302014-08-08T00:44:00+5:30
कृषीविषयक मार्गदर्शनही हवे

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे
फलटण : ‘पूर्वी शेती पंचागावर केली जात असे अलीकडे ते शास्त्र निरुपयोगी ठरत असून, मान्सूनच्या लहरीपणाचा परिणाम शेती उत्पादनावर होत असताना हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील कृषी महाविद्यालय आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या कृषी हवामान वेधशाळेचे उद्घाटन व त्यानंतर आयोजित कार्यक्रमात रामराजे बोलत होते. यावेळी कृषी हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी पुणे) विभागाचे डॉ. एन. चट्टोपाध्याय, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषीतज्ज्ञ आर. व्ही. निंबाळकर उपस्थित होते.
सध्या केंद्र शासनाचे धोरण वातावरण बदलाच्या होणाऱ्या परिणामांबाबत गांभीर्याने विचार करणारे असून, शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाची दररोज माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी सध्या २५ संस्था संयुक्तपणे कार्यरत असल्याचे डेप्यु. डायरेक्टर डॉ. एन. चटोपाध्याय यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस.बी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गीतांजली नेवसे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी डोईफोडे, वसंतलाल शहा (पाचवडकर), राधाकृष्ण तेली, जे.एच. गरवालीया, मिस्त्री, हेमंत रानडे, भोजराज नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती दत्तात्रय गुंजवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषीविषयक मार्गदर्शनही हवे
शेती उत्पादन वाढीसाठी दीर्घमुदतीचा हवामान विषयक अंदाज उपयुक्त ठरत नाही, त्यासाठी त्या-त्या परिसरातील हवामानविषयक दैनंदिन अंदाज व माहिती शेतकऱ्याला हवामानविषयक अंदाजाबरोबरच कृषी खात्याने कोणती पिके घ्यावीत, त्यासाठी घ्यावयाची विशेष दक्षता याबाबतही हवामान अंदाजाचा विचार करून योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.