शेतकऱ्यांची अडवणूक
By Admin | Updated: October 23, 2014 00:16 IST2014-10-22T21:19:20+5:302014-10-23T00:16:15+5:30
सेवा सोसायट्यांची अनास्था : खते, बियाणे देण्यास टाळाटाळ

शेतकऱ्यांची अडवणूक
गगनबावडा : कृषी विभाग व शेतकरी यांच्यात महत्त्वाचा दुवा ठरणाऱ्या सोसायट्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतांचा पुरवठा करण्याबाबत गावातील सहकार विकास सोसायट्यांनी अनुत्सुकता दर्शविली असल्याने शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना खते व बी-बियाणे सेवा सोसायट्यांमार्फत स्थानिक पातळीवर देण्यात येत असल्यामुळे त्यांच्या वेळेचा अपव्यही टळत होता. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सोसायट्यांनी खते, बी-बियाणे खरेदी करण्यास नकार दर्शविल्याचे कृषी विभागाकडून समजते. मुळात कृषी विस्तार व कृषी उत्पन्न वाढावे यासाठी या सोसायट्यांनी स्थानिक पातळीवर कृषी विभाजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साधनसामग्री पुरविणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश सर्व सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देऊन बाकीची जबाबदारी झटकताना दिसतात.
कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकरी व कृषी विभाग यांच्यात गावातील विकास सोसायटी हा केंद्रबिंदू आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला ग्राम स्थरावर सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना साधनसामग्री, कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. किंबहुना सोसायटी ही शेतकऱ्यांना महत्त्वाचा दुवा ठरणारी अशी संस्था आहे. विकास सोसायटीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असतानाही तालुक्यातील सोसायटी चालकांच्या अनास्थेपायी शेतकऱ्यांना खते व बियाणे खरेदी करण्यासाठी तालुकास्तरावर पायपीट करावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये सोसायट्यांच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.