जिल्ह्यातील शेतकरी ऊस दरासाठी रस्त्यावर

By Admin | Updated: January 14, 2015 00:30 IST2015-01-13T23:33:06+5:302015-01-14T00:30:57+5:30

आंदोलन चिघळले : ठिकठिकाणी रास्ता रोको, साखरसम्राटांच्या पुतळ्याचे दहन; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Farmers of the district on the road for sugarcane prices | जिल्ह्यातील शेतकरी ऊस दरासाठी रस्त्यावर

जिल्ह्यातील शेतकरी ऊस दरासाठी रस्त्यावर

सांगली : एफआरपीप्रमाणे उसाला दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज (मंगळवारी) जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. तसेच साखर कारखानदारांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे साखर कारखानदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ताकारी व बहे येथे रास्ता रोको करण्यात आला. येडेमच्छिंद्र येथे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पाटील, पक्षप्रवक्ते मधुकर डिसले यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर साखर कारखानदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी प्रकाश देसाई, मानसिंग नांगरे, बाजीराव पाटील, विठ्ठलराव पाटील, बंडा नांगरे उपस्थित होते.
ताकारी येथे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर कदम, जयवंत पाटील, खानापूर तालुकाध्यक्ष हिम्मतराव पाटील, सचिन पवार, शहाजी पाटील, सागर पाटील, कृष्णा पवार, शिवाजीराव मोर आदींच्या उपस्थितीत कऱ्हाड-तासगाव व ताकारी ते इस्लामपूर या मार्गावर सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला.
बहे येथे तालुका उपाध्यक्ष शहाजी पाटील, गणेश शेवाळे, उत्तमराव पाटील, सुरेश पाटील, हसन मुल्ला आदींच्या उपस्थितीत रेठरे कारखाना ते इस्लामपूर या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
तासगाव : उसाच्या किमान आधारभूत किमतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (मंगळवारी) पाचवा मैल (ता. तासगाव) येथील मुख्य चौकात काही काळ रास्ता रोको केला.
पाचवा मैलावरील चौकात भिलवडी, पलूस, तासगाव, सांगलीकडे जाणाऱ्या गाड्या अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. काल कवठेएकंद, कुमठे फाटा येथे किरकोळ प्रकार केल्यानंतर आज कार्यकर्त्यांनी पाचवा मैलावरील रस्ते अडविले. यावेळी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चारीही मार्गावर प्रवासी, मालवाहतूक तसेच खासगी गाड्या रोखून धरण्यात आल्या होत्या. काही वेळानंतर आंदोलन संपविण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा आणि तासगाव, पलूस तालुक्यातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
भिलवडी : उसाला एफआरपीनुसार दर द्यावा, या मागणीसह पुणे येथील साखर आयुक्तांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काल भेट नाकारल्याच्या निषेधार्थ आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी वसगडे (ता. पलूस) येथे राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत, शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आज दिवसभर तासगाव तालुक्यातील पाचवा मैलसह पलूस तालुक्यातील माळवाडी, आमणापूर या ठिकाणी रास्ता रोको केला.
दोन दिवसांपूर्वीच स्वाभिमानीने वसगडेत रास्ता रोको केला होता. कालच्या पुण्यातील घटनेचे पडसाद पलूस तालुक्यात आज दिवसभर उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी पाचवा मैल येथे दोन तास रास्ता रोको केला. याचा तासगाव-इस्लामपूर, कोल्हापूर, पलूस-सांगली अशा वाहतुकीवर परिणाम झाला. यानंतर माळवाडी येथील बसस्थानकावर दीड तासांचा रास्ता रोको केला. आमणापूर गावामध्येही शेतकरी वर्गाने चौकामध्ये रास्ता रोको केला.
उसाला दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्यास असमर्थ असणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत वसगडेतील चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. स्वाभिमानीचे प्रवक्ते महेश खराडे, सतीश पाटील, गुलाबराव यादव, शरद शेळके आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले.
आष्टा : खासदार राजू शेट्टी यांना पुणे येथे झालेली अटक व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची शेतकऱ्यांच्या ऊस दराबाबतच्या उदासीन भूमिकेविरोधात उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज (मंगळवारी) आष्टा बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पोलीस आल्यानंतर आंदोलन बंद करण्यात आले.
सकाळी साडेआठच्यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आष्टा शहराध्यक्ष सुरेश आवटी, ‘युवक’चे अध्यक्ष प्रदीप घसघसे, प्रवासी वाहतूक संघटनेचे प्रमोद ढोले, तासगाव तालुकाध्यक्ष महेश खराडे, पलूस तालुकाध्यक्ष महावीर पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, सुदर्शन वाडकर, विजय
चौगुले, जयकुमार कोले उपस्थित
होते.
गुंडाभाऊ आवटी म्हणाले की, जिल्ह्यातील कारखानदार साखरेस कमी दर आहे म्हणून एफआरपीप्रमाणे दर देऊ शकत नाही, असे म्हणतात. मग जिल्ह्यातील अनेक कारखानदार ६० ते ७० किलोमीटर दूर जाऊन नवीन कारखाने उभारत आहेत, हे त्यांना परवडते का? यावेळी आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण यांच्यासह पथक घटनास्थळी आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कुरळप : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुरळप पोलिसांनी वाळवा तालुक्यातील येलूर, येडेफाटा, तांदुळवाडी येथे बंदोबस्त ठेवला
होता. यामुळे या परिसरातील ऊस वाहतूक सुरळीत सुरु होती. कुरळप पोलिसांनी तांदुळवाडी, येलूर, येडेफाटा येथे बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांची गाडी नेहमीच भागातून गस्त घालताना दिसून येत होती. जमावबंदी आदेशामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)

बागणी येथे उत्स्फूर्त बंद
बागणी (ता. वाळवा) येथे आज (मंगळवार) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पुकारलेल्या बागणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी कार्यकर्त्यांनी साखरसम्राटांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. सकाळी गावातील प्रमुख मार्गावरुन
दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. ‘स्वाभिमानी’चे बागणी अध्यक्ष संभाजी चौगुले, आनंदराव डहाळे, भगवान साखरे, शशिकांत नगारे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Farmers of the district on the road for sugarcane prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.