शेतकऱ्यांची तीन हजार पेन्शनची मागणी

By Admin | Updated: September 1, 2014 23:48 IST2014-09-01T23:44:10+5:302014-09-01T23:48:46+5:30

कोल्हापूर शहर व परिसरातील लाक्षणिक उपोषण सुरू : किसान सभेचे आंदोलन; शंभरहून अधिक सहभागी

Farmer's demand for three thousand pensions | शेतकऱ्यांची तीन हजार पेन्शनची मागणी

शेतकऱ्यांची तीन हजार पेन्शनची मागणी

कोल्हापूर : साठ वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, २०१३ साली केलेला भूसंपादनाचा कायदा बदलला जाऊ नये, आदी विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारपासून तीन दिवसांच्या उपोषणाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर व परिसरातील सुमारे १०० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले.
देशभरातील वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, भूसंपादनाचा कायदा बदलला जाऊ नये, त्याचबरोबर स्वामीनाथन समितीने शिफारस केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्केइतकी शेती मालाची आधारभूत किंमत जाहीर करावी, अशा मागण्या किसान सभेने केल्या. त्यासाठी अ.भा. किसान सभेने संपूर्ण देशपातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग ७२ तासांचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरातही या उपोषणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठी पेन्शनचा कायदा करण्याचे अभिवचन राज्यसभेत दिल्यानंतरही या कायद्याबाबतचे नोटिफिकेशन काढलेले नाही. केंद्र सरकाने ताबडतोब लक्ष घालून पेन्शनचा कायदा बनविण्यासाठी पावले टाकावीत, अशी मागणी राज्य सरचिटणीस नामदेव गावडे यांनी केली. देशभरातील या उपोषणाद्वारेही सरकारला जाग येणार नसेल, तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी दिल्लीत जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही गावडे यांनी दिला.
उपोषणाचे नेतृत्व नामदेव गावडे यांच्यासह रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, आशा कुकडे, सुशीला यादव, बाबा यादव, महादेव आवटे, संजय पाटील, दिनकर सूर्यवंशी, भारती जाधव, कृष्णात जाधव, नामदेव पाटील, शिवाजी सूर्यवंशी, आदींनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer's demand for three thousand pensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.