बांदीवडेत शेतकऱ्याचा खून
By Admin | Updated: May 4, 2015 00:57 IST2015-05-04T00:57:24+5:302015-05-04T00:57:24+5:30
जमिनीचा वाद : संशयिताचे घर जमावाने पेटविले; प्रापंचिक साहित्याची नासधूस

बांदीवडेत शेतकऱ्याचा खून
पन्हाळा/कोतोली : पन्हाळा तालुक्यातील बांदीवडे येथील नाना बापू पाटील (वय ६०) या शेतकऱ्याचा जमिनीच्या वादातून शनिवारी मध्यरात्री खून झाल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता उघडकीत आली. याप्रकरणी संशयित सुखदेव गिरीगोसावी व नामदेव गिरीगोसावी यांच्या बांदीवडे येथील शेतामधील घर संतप्त नागरिकांनी पेटवून दिले. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नामदेव शामराव गिरीगोसावी व नाना बापू पाटील या दोघांमध्ये जमीन गट नं. ३१२ च्या कारणावरून गेल्या चार वर्षांपासून भांडणे सुरू आहेत. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात वारंवार एकमेकांविरोधात तक्रारी दाखल आहेत. नाना पाटील यांनी आपली जमीन चार वर्षांपूर्वी विकली होती. ती जमीन नामदेव गिरीगोसावी याने खरेदी केली आहे. ही जमीन बल्डिंग करून चांगली केल्यानंतर नाना पाटील ही जमीन माझीच म्हणून गिरीगोसावी यास धमकावत असे व त्यातून भांडणे होत होती.
नाना पाटील हे शनिवारी शेतजमिनीच्या वादाबाबत पन्हाळा कोर्टात गेले होते; पण रात्री ते परत आलेच नाहीत. त्यानुसार त्यांचा शोध सुरू होता. तसेच नाना पाटील यांचा मोबाईलसुद्धा बंद होता. दरम्यान पाटील यांच्या कुटुबिंयांनी त्याचा शोध घेण्यास सुरु केले. दरम्यान करंजफेण ते बांदिवडे या रस्त्यावरील गटारात रविवारी सकाळी त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. पाटील यांचा मृतदेह सापडल्यामुळे त्यांचे नातेवाईक संतप्त झाले.
घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर असलेले संशयित आरोपी गिरीगोसावी बंधुंचे शेतातील घर पाटील यांच्या नातेवाइकांनी पेटवून दिले, तर घरातील प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी विशेष पोलीस पथक तैनात केले. खूनाबाबतची फिर्याद मृत नाना पाटील यांचे बंधू आण्णा बापू पाटील यांनी पन्हाळा पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक केली नसल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)