कृषी पंढरीत शेतकऱ्यांची मांदियाळी

By Admin | Updated: November 27, 2014 00:23 IST2014-11-26T22:34:15+5:302014-11-27T00:23:41+5:30

आधुनिक तंत्रज्ञान : शेती अवजारे, गृहोपयोगी वस्तू, पशुपक्ष्यांनी प्रदर्शन बहरले, हजारो शेतकरी दाखल

Farmers' attention in Agriculture Stones | कृषी पंढरीत शेतकऱ्यांची मांदियाळी

कृषी पंढरीत शेतकऱ्यांची मांदियाळी

कराड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन झाले़ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी हजारो शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली़ प्रदर्शनात दाखल झालेली नावीन्यपूर्ण फळे, भाज्या व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची त्यांनी कुतूलहलाने पाहणी केली़
शेती व शेतीपूरक वस्तूंची रेलचेल असलेल्या येथील यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनास लाखो शेतकरी भेट देत आहेत. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, विविध कृषी उत्पादने, कृषी योजनांची माहिती, नावीन्यपूर्ण शेती अवजारे, शेतीविषयक माहिती पुस्तके, कृषीशी निगडीत व्यवसायातून आर्थिक समृद्धीचा मंत्र देणाऱ्या पशुपालन व्यवसायाची अद्ययावत माहिती प्रदर्शनात उलपब्ध आहे. प्रदर्शनात कृषी, गृहोपयोगी वस्तू, अवजारे यांची वेगवेगळी दालने आहेत. एकाच ठिकाणी शेतीसह पशुपक्षी, गृहोपयोगी वस्तू यासह सर्व काही असल्याने हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणीच ठरले आहे. विविध वस्तूंच्या खरेदीविक्रीतून येथे हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.
प्रदर्शनात बुधवारी वेगवेगळ्या प्रकारची फळे, फुले व भाजीपाला समाविष्ट करण्यात आला होता़ तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त कृषी अवजारेही प्रदर्शनात दाखल झाली आहेत़ जनावरांच्या प्रदर्शनातील विविध खिलार जातींचे बैल, गायी, म्हैस, रेडा, जर्सी, होस्टन जातीची गाय यासह पक्षी, पिके, फळे, फुलांनी प्रदर्शन बहरले आहे. विविध स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतंत्राबद्दल माहिती मिळत आहे़ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे इस्त्रायली ड्रिप तंत्रज्ञान प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे़ गहू, भात, सोयाबीन, गवत, कडबा आणि इतर पिकांचे कापणी आणि बांधणी यंत्राबद्दलही शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे़ प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. यामध्ये बाहेरील जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचाही समावेश होता. (प्रतिनिधी)


पंचायत समितीच्या कृषी विभागाचा ‘फ्लॉप शो’
कराड : येथील बैलबाजार तळावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल लागले आहेत. प्रत्येक विभागाने शेती व शेतीपूरक व्यवसायांची जास्तीत जास्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलाय; पण याच गर्दीत अग्रभागी असतानाही पंचायत समितीच्या कृषी विभागाचा ‘फ्लॉप शो’ चाललाय. शेतकऱ्यांऐवजी ‘चमकोगिरी’ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच हा स्टॉल ‘हायजॅक’ केलाय. कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त शेती व शेतीपूरक व्यवसायांची भरघोस माहिती मिळत आहे. प्रदर्शनात एका बाजूस विविध कंपन्या व खासगी फर्मचे अनेक स्टॉल उभारण्यात आलेत, तर शासनाच्या विविध विभागाच्या स्टॉल्ससाठी स्वतंत्रव्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी राज्य शासनाचा कृषी विभाग व पंचायत समितीच्या कृषी विभागाचे स्वतंत्र स्टॉल आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाने विविध प्रकारच्या प्रतिकृती उभारून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. संबंधित स्टॉलवर शेतकऱ्यांना एकरी शंभर टनांहून अधिक उत्पन्न कसे काढावे, शेतामधील पाणी व्यवस्थापन कसे करावे, फळे व फुलांचे जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, यासह कोरडवाहू शेतीविषयी पूरक माहिती मिळत आहे. तसे नियोजनही राज्य शासनाच्या कृषी विभागाने केले आहे. मात्र, तेथूनच काही अंतरावर अग्रभागी असलेल्या पंचायत समिती कृषी विभागाच्या स्टॉलवर शेतकऱ्यांना फक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रूबाब पाहायला मिळतोय. अतिशय कमी जागेत असलेला हा स्टॉल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गर्दीनेच ‘फुल्ल’ झाल्याचे दिसते. माहिती देण्याऐवजी त्याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना चक्क हुसकावण्याचाही प्रकार होतोय.



देशी केळीला प्रथम क्रमांक
पोतले येथील हणमंत सुतार यांच्या मालकीच्या देशी केळीला प्रथम, विरवडेतील सुभानराव शिंदे यांच्या मालकीच्या जी-९ जातीच्या केळीला द्वितीय, तर येणकेतील निवास गरूड यांच्या मालकीच्या जी-९ जातीच्या केळीला तृतीय क्रमांक देण्यात आला. तर येणकेतील प्रशांत गरूड व कुसूर येथील शिवराज देशमुख यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.



कार्नेशियन प्रथम, जरबेरा द्वितीय
फूलपीक स्पर्धा (हरितगृहातील) - राजमाची येथील प्रवीण पाटील यांच्या कार्नेशियन फुलाला प्रथम. जानुगडेवाडी, ता. पाटण येथील सदानंद जानुगडे यांच्या जरबेरा फुलाला द्वितीय, तर वाठार येथील सुनील जाधव यांच्या जरबेरा फुलाला तृतीय क्रमांक देण्यात आला. नागठाणे येथील मनोहर साळुंखे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. परीक्षक म्हणून अजित मोहिते, शंकर खोत, माधवी गायकवाड, विलास देशमुख, सुधीर चिवटे, बी. जी. शेळके, राजन धोकटे, पूनम चौधरी, पी. डी. हळकर, क्षमा माळी, कृषी अधिकारी गोखले यांनी काम पाहिले.
गाय स्पर्धेचा निकाल
खिलार गाय - केणे, ता. वाळवा येथील बजरंग पाटील प्रथम, खातगुण येथील प्रभाकर जाधव द्वितीय, पुसेगाव येथील सुधीर जाधव यांच्या गायला तृतीय क्रमांक देण्यात आला.
खिलार कालवड - महूद, ता. सांगोला येथील पोपट ठोंबरे यांच्या कालवडला प्रथम, साखरवाडी येथील फरीद शेख यांना द्वितीय, तर आरळेतील अनिल वाघमळे व ललगुणच्या विजय सुतार यांच्या कालवडला तृतीय क्रमांक देण्यात आला.
जर्सी गाय - रिसवड येथील दीपक इंगवले प्रथम, आटकेतील अजय पाटील द्वितीय.
म्हैस स्पर्धेचा निकाल
पंढरपुरी म्हैस - सातवे, ता. पन्हाळा येथील शहाजी जाधव यांच्या म्हशीला प्रथम, येलूर येथील दत्तात्रय शिणगारे यांच्या म्हशीला द्वितीय व पोतले येथील समृद्धी कुलकर्णी यांच्या म्हशीला तृतीय
मुऱ्हा म्हैस - गोळेश्वर येथील विलास जाधव यांच्या म्हशीला प्रथम, धनंजय जाधव यांच्या म्हशीला द्वितीय, तर शंभूराज जाधव यांच्या म्हशीला तृतीय
जातिवंत रेडा - गोळेश्वरमधील उमेश जाधव, बेलवाडीतील शरद गायकवाड व येलूरमधील संजय जाधव यांच्या मालकीच्या रेड्याला अनुक्रमे तीन क्रमांक


मर्ढेतील खोंड
‘चॅम्पियन आॅफ द शो’
खिलार खोंड आदत - मर्ढे येथील भाऊसाहेब चव्हाण यांच्या खोंडाला प्रथम, खातगुणमधील श्रीमंत भोसले यांच्या खोंडाला द्वितीय, तर घनश्याम लावंड व धनाजी श्रीखंडे यांच्या खोंडाला विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
खिलार खोंड दोन दाती - महूद येथील सोपान ठोंबरे, मर्ढे येथील सोपान शिंगटे तर बुध येथील शब्बीर मुलाणी यांच्या खोंडाला तृतीय क्रमांक देण्यात आला.
खिलार खोंड चार दाती - मर्ढेतील सोपान शिंगटे, पुसेगावमधील लक्ष्मण जाधव, खेडमधील पंडितराव पाटील व शिवाजी पिसुतरे यांच्या खोंडाला अनुक्रमे तीन क्रमांक देण्यात आले.
खिलार बैल जुळीक - मर्ढेतील सोपानराव शेटे यांच्या खोंडाला प्रथम, साखराळेतील धनाजी डांगे यांच्या खोंडाला द्वितीय, तर मांगरूळ येथील शंकर खांडेकर यांच्या खोंडाला तृतीय क्रमांक देण्यात आला.
चॅम्पियन आॅफ द शो - मर्ढेतील सोपान शिंगटे यांचा चारदाती खिलार खोंड ‘चॅम्पियन आॅफ द शो’ ठरला.
स्पर्धेत दोनशेवर जनावरे
प्रदर्शनात बुधवारी गाय, म्हैस, बैल स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सातारासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील जनावरांना सहभागी करण्यात आले होते. खिलार, हो फ्रिजन, जर्सी, जर्मन जातीच्या गाय, दोन दाती, चार दाती व जुळीक खोंड. पंढरपुरी, मुऱ्हा जातीची म्हैस आदी २०३ जनावरे स्पर्धेच्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळाली.

Web Title: Farmers' attention in Agriculture Stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.