जिल्हा बँक राबवणार ‘किसान साहाय्य कर्ज योजना’
By Admin | Updated: June 7, 2014 01:04 IST2014-06-07T01:03:46+5:302014-06-07T01:04:24+5:30
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निर्णय

जिल्हा बँक राबवणार ‘किसान साहाय्य कर्ज योजना’
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) शेतकऱ्यांसाठी ‘किसान साहाय्य कर्ज योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जाशिवाय इतर गरजांसाठी आर्थिक संस्था व सावकारांच्या दारात जावे लागते. यासाठी बँकेने ही अभिनव योजना सुरू केली असून बागायतदार शेतकऱ्याला एकरी ४० हजार रुपये सुलभ व्याजाने मिळणार आहे.
जिल्ह्यातील विकास सेवा संस्था जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाबरोबरच शेतीपूरक व अनुषंगिक कारणासाठी कर्जपुरवठा करतात. याशिवाय शेतकऱ्यांना औषधोपचार, विवाह, यात्रा, सहल, व्यावसायिक गरजा, शैक्षणिक खर्च, किरकोळ घराची दुरूस्ती, आदी अनुषंगिक कारणासाठी तत्काळ पैशांची गरज असते. या गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. हात उसने घेणे, सावकारांकडून कर्ज घेणे, नागरी बॅँका, पतसंस्था, भिशी योजनेतून यांच्याकडून जादा व्याजाने पैसे घेतले जातात. या सर्वप्रकारच्या कर्जामुळे शेतकऱ्यांवर व्याजाचा जादा भुर्दंड बसतो. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी कर्ज मागणी अर्जासोबत ‘८ अ’ व ७-१२ उतारे देऊन कर्ज मागणी करण्याची आहे. कर्जाची परतफेड ३ ते ५ समान वार्षिक हप्त्यात करावयाची आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी या नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी केले आहे.