शेतकऱ्यांची लूट होतेय; कृषी विभाग झोपलाय काय ?
By Admin | Updated: July 22, 2014 00:41 IST2014-07-22T00:24:02+5:302014-07-22T00:41:12+5:30
संजय पवार यांचा सवाल- : बनावट कीटकनाशक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यासाठी केले आंदोलन

शेतकऱ्यांची लूट होतेय; कृषी विभाग झोपलाय काय ?
कोल्हापूर : दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत माती टाकून लुटले जात असताना कृषी विभाग झोपा काढतोय काय? असा सवाल करत शाहूपुरी येथील बनावट कीटकनाशक विक्रेत्याचा परवाना कायमचा रद्द करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. परवाना रद्द करून सर्वच दुकानांतील स्टॉकची तपासणी करा, अन्यथा कृषी अधीक्षक कार्यालय रस्त्यावर येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी येथील शेती बीज भांडार दुकानात बनावट कंपनीचे कीटकनाशक सापडले. याच दुकानदाराने बनावट सूर्यफुल विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. त्यावेळीच परवाना रद्द केला असता तर पुन्हा शेतकऱ्यांना फसवले नसते, असे सांगत संजय पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी नंदकुमार कदम यांना धारेवर धरले. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली. मात्र, कृषी विभागाने काय केले ते सांगा, अशी विचारणा पवार यांनी केली. परवाना रद्द करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे कदम यांनी सांगितले. यावर संतप्त होत, मग नेमके तुम्हाला अधिकार काय आहेत? बाहेरची कंपनी येते आणि बनावट औषध शोधते, कृषी विभाग झोपा काढतोय काय? अशी विचारणा पवार यांनी केली. यामध्ये हस्तक्षेप करत कारवाई करणार नसाल, तर कार्यालयाला कुलपे ठोकू, असा इशारा तानाजी आंग्रे व संभाजी जाधव यांनी दिला. त्यानंतर परवाना रद्द करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू करून सर्व विक्री केंद्रांची तपासणी आठ दिवसांत करण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. यावेळी जि. प. सदस्य बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, विनोद खोत, संजय जाधव, सुनील पोवार, शशी बिडकर, दिलीप जाधव, विक्रम चौगुले, किरण माने, डॉ. अनिल पाटील, विराज पाटील, भगवान कदम उपस्थित होते.
‘आटोळे नव्हे, वाटोळेसाहेब’
वारंवार फसवणूक होऊन शेतकऱ्यांचा हंगाम वाया जात असताना, हा विभाग अजिबातच जागरूक नाही. ‘दोघे मिळून खाऊ आणि शेतकऱ्यांना लुटू’ अशी प्रवृत्ती अधिकारी व दुकानदारांची असल्याचा आरोप करत कृषी अधीक्षक ‘आटोळे नव्हेत, ते वाटोळेसाहेब’ असल्याची टीका दिलीप पाटील-कावणेकर यांनी केली.
अन् पवार यांचा राग अनावर
फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांची कैफियत मांडत, संबंधित दुकानदार तुमचा जावई आहे काय? अशी विचारणा संजय पवार यांनी केल्यानंतर तंत्र अधिकारी कदम हसू लागले. त्यामुळे पवार चांगलेच संतापले, विषयाचे गांभीर्य तुम्हाला नाही, हसण्यावर नेऊ नका, अन्यथा खुर्ची जाग्यावर राहणार नाही, असा दम पवार यांनी दिल्याने कार्यालयात वातावरण चांगले गरम झाले.