शेतकरी अपघात विमा भरपाई दुप्पट
By Admin | Updated: November 30, 2015 01:06 IST2015-11-30T00:50:40+5:302015-11-30T01:06:18+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : १ डिसेंबरपासून योजनेसाठी लाभार्थी पात्र

शेतकरी अपघात विमा भरपाई दुप्पट
प्रकाश पाटील -- कोपार्डे -शेतकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या शेतकरी विमा योजनेच्या भरपाईची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) याबाबतची घोषणा करण्यात आली असून अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी आता एक लाख रुपये मिळणारी भरपाई दुप्पट करण्यात आली असून त्याची रक्कम दोन लाख करण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने वार्षिक २७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
राज्यात सन २००४ पासून शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन २०१०-११ ला या योजनेचे नामकरण शेतकरी जनता अपघात विमा योजना करण्यात आले. या योजनेत १० ते ७५ वयोगटातील खातेदार शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी एक लाख रूपये भरपाई देण्यात येत होती. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरपाईमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता अपघाती मृत्यू झाल्यास आणि कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये विमा संरक्षण त्या शेतकऱ्याला मिळणार आहे, तर ५० टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये भरपाई शेतकरी अपघात विम्यापोटी मिळणार आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रियेतून राष्ट्रीय विमा कंपनीची (नॅशनल इन्शुरन्स कंपनी) निवड करण्यात आली आहे. राज्य सरकार प्रत्येक खातेदार शेतकऱ्याच्या पोटी १९ रुपये खर्च करणार आहे. राज्यभरातील १ कोटी ३७ लाख खातेधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यभरातील सर्व खातेधारक शेतकऱ्यांचा एकरकमी विमा हप्ता भरण्यासाठी राज्य
सरकार २७ कोटी रुपये खर्च करणार आहे.
शेती करताना अपघाती मृत्यू होणे, कायमचे अथवा काहीअंशी अपंगत्व येणे, वीज पडून मृत्यू होणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का बसून मृत्यू आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे झालेल्या अपघातात अपंगत्व येणे किंवा मृत्यू पावणारे शेतकरी या योजनेस पात्र होतील.
शेतकऱ्यास लाभदायक : त्रुटी दूर करा
अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी एक लाखऐवजी मिळणार शेतकऱ्याला दोन लाख रूपये.
एक कोटी ३७ लाख खातेदार शेतकऱ्यांना होणार लाभ
शासनाने अपघात विम्याच्या भरपाईत वाढ केल्याने दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला
मोठा आर्थिक आधार मिळणार
आहे. मात्र, यातील अटी व शर्र्थींमुळे काहीवेळा अडथळे निर्माण होऊन लाभार्थ्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास होतो. त्याबाबत पारदर्शकता हवी.
- विठ्ठल पाटील,
शेतकरी, पाटपन्हाळा, ता. पन्हाळा
हा शासनाचा दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिलासा आहे. मात्र, बहुतांश शेतकरी कुटुंबात एक खातेदार असतो. मात्र, काम करणारे सर्व कुटुंब असते. खातेदाराव्यतिरिक्त कुटुंबातील इतर व्यक्तीला त्याचा लाभ होत नाही. याबाबत सर्व कुटुंबाला संरक्षण मिळणारे धोरण ठरवावे.
- कृष्णात पाटील,
शेतकरी, वाकरे, ता. करवीर