पावसाच्या ओढीने शेतकरी घायाळ !
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T01:01:18+5:302014-07-08T01:06:58+5:30
परिस्थिती गंभीर नाही : जिल्ह्यात उपसा बंदी नाहीच; एक महिना पुरेल एवढे पाणी शिल्लक

पावसाच्या ओढीने शेतकरी घायाळ !
कोल्हापूर : वेळेवर आणि भरपूर पाऊस पडणारा जिल्हा अशी संपूर्ण राज्यात ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने यंदा ओढ दिल्यामुळे शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. पाऊस आज पडेल, उद्या पडेल म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या शेतकऱ्यांचे डोळे मात्र सध्या ढगांकडे लागले आहेत. पावसाने ओढ दिली असल्याने सर्वांचीच चिंता कायम असली तरी परिस्थिती मात्र गंभीर नाही, असा प्रशासनाचा दावा आहे. अद्यापही एक महिना पुरेल इतका पाणीसाठा धरणात असल्याने जिल्ह्यात कोठेही पाणी उपसा बंदी लागू केलेली नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी व नागरिकांना पिण्यासाठी नद्यांत पाणी सोडले जात आहे.
जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस म्हणावा तितका झालेला नाही. दरवर्षी हमखास चांगला पाऊस होतो. विशेष म्हणजे वेळेवर पडतो. कालचक्रानुसार पंधरा तीन आठवडे इकडे तिकडे होतात. परंतु, यावर्षी एक महिना ओलांडून गेला. मृग आणि आद्रा नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. वास्तविक आद्रा नक्षत्रात मोठा पाऊस होऊन नद्या-नाले भरून वाहात असतात. परंतु, यंदा महत्त्वाची दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक तर जिल्ह्यात खरिपाच्या फक्त २५.४९ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उसाचे क्षेत्र धरून ५६.६३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रात भाताची लागवड व्हायची बाकी आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके करपण्याची शक्यता आहे.
पावसाने ओढ दिली असली तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडील धरणात अद्याप एक महिना शेतीला व पिण्यास पाणी पुरवू शकेल एवढा पाणीसाठा शिल्लक असल्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले. भोगावती नदीत पूर्वी २०० क्युसेक्स पाणी सोडले जात होते. त्याचा विसर्ग वाढवून ६०० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वारणा धरणातून पाणी सोडले असून, उद्या, मंगळवारपर्यंत हे पाणी इचलकरंजीला पोहोचणार आहे. अगदीच परिस्थिती नाजूक बनली तर रोेटेशन पद्धतीने पाणी सोडले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सध्या पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी व्यवस्थित पुरवठा होत आहे. एकाही गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही, असा दावा जिल्हाधिकारी माने यांनी केला. (प्रतिनिधी)