वाकरेतील शेतकऱ्याने तोडली केळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:52+5:302021-05-19T04:23:52+5:30
कोपार्डे : कोरोनाच्या संकटाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. लॉकडाऊनमुळे केळीला खप नसल्यामुळे आणि भाव पडल्यामुळे वाकरे, ता. ...

वाकरेतील शेतकऱ्याने तोडली केळी
कोपार्डे : कोरोनाच्या संकटाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. लॉकडाऊनमुळे केळीला खप नसल्यामुळे आणि भाव पडल्यामुळे वाकरे, ता. करवीर येथील शेतकरी संजय पाटील यांनी केळी घडासह तोडून त्यात मेंढरं सोडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी फूलशेती, भाजीपाला, केळी, कलिंगड, काकडी, फळभाज्या याकडे वळला आहे. यातून चांगला नफा मिळत असल्याने शेतकरी कष्ट व गुंतवणूक पणाला लावत असतात.
मात्र, ऐन हंगामात गेेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी व लॉकडाऊन शेतकऱ्यांच्या जिवावर उठत आहे. लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद झाल्याने झेंडू फुलाला मागणी नसल्याने बहरलेल्या झेंडूच्या शेतात गणेशवाडीतील पोंडकर या शेतकऱ्याने मेंढरे सोडून रोटर फिरवला होता. असाच प्रकार वाकरे येथील शेतकऱ्याने केला आहे.
संजय पाटील व त्यांचा भाऊ प्रकाश पाटील यांनी एक एकर क्षेत्रात केळीची लागवड केली होती. सध्या ही केळी काढण्यासाठी आली आहे; पण लॉकडाऊनमुळे याला ग्राहक नाही. व्यापारीही खप नसल्याने केळी घ्यायला तयार नाहीत. जे मागतात ते पाच आणि सहा हजार रुपये टनाने मागत आहेत. यामुळे निराश होऊन या शेतकऱ्याने सरळ केळीवर कुऱ्हाड चालवली असून, यात मेंढरांचा कळप सोडला आहे. लॉकडाऊनच्या आधी ५० हजार रुपयांची केळी विक्री झाली. आता ग्राहक नाहीत. लॉकडाऊनमुळे गावागावांत जाऊनही विकता येत नसल्याने संजय पाटील यांनी केळी सरळ कापून टाकल्या आहेत.
प्रतिक्रिया
मागील वर्षीही लॉकडाऊनचा फटका बसला. यावर्षी तरी उत्पन्न मिळेल अशी आशा होती; पण पुन्हा लॉकडाऊन पडले. व्यापारीही पाच हजार टन मागत आहेत. ८० हजार खर्च करून दोन - अडीच लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. फक्त ५० हजारांची केळी विकली आहे. मागणी नसल्याने सरळ केळी कापून टाकली आहे. - संजय पाटील (शेतकरी वाकरे)
फोटो
केळीला मागणी नसल्याने वाकरे (ता. करवीर) येथील संजय पाटील या शेतकऱ्याने केळी कापून मेंढरांचा कळप बसविला आहे.