शेळपबांबर ता, राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2023 15:14 IST2023-01-01T15:14:22+5:302023-01-01T15:14:50+5:30
गौरव सांगावकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी: राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात असलेल्या हसणेपैकी बांबर येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी ...

शेळपबांबर ता, राधानगरी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
गौरव सांगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी: राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात असलेल्या हसणेपैकी बांबर येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. ग्रामस्थ आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.
हसणेपैकी बांबर येथील शेतकरी प्रकाश महादेव म्हाबळे (वय ७०) हे सकाळी साडेअकराच्या दरम्यान जनावरांना वैरण आणण्यासाठी शेतामध्ये गेले असता झुडपातुन अचानक गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.यानंतर त्यांना जवळच्या दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी दवाखाना बंद असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, या ठिकाणी त्यांना उपचार करून पुढील उपचारास कोल्हापूर येथे पाठवण्यात आले.
अभयारण्य क्षेत्रात असलेल्या शेळप,बांबर, हसणे, ओलवन, मांढरेवाडी व दाजीपूर परिसरातील वाड्यावस्त्या वरील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, असे अपघात झाल्यास लोकांना प्राथमिक उपचार वेळेत न मिळाल्याने काही रुग्णांना वेळेत उपचार घेता येत नाही, त्यामुळे दाजीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचारी नियुक्त करून सुरू करण्याची मागणी हसणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पूजा शरद पाटील व ग्रामस्थांनी केली आहे,तसेच वनविभागाकडून जखमींला तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली आहे.