मोजणी अन् नकाशात ११ वर्षे अडकली शेतजमीन
By Admin | Updated: July 9, 2015 00:20 IST2015-07-09T00:20:39+5:302015-07-09T00:20:39+5:30
शेतकरी हवालदिल : करवीर तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रताप

मोजणी अन् नकाशात ११ वर्षे अडकली शेतजमीन
कोल्हापूर : करवीर तहसीलदार कार्यालय व करवीर भूमी अभिलेख कार्यालयाच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या भूमिकेमुळे शेतजमीनधारकांना हक्काची हद्द वाटून घेऊन नकाशाच्या किरकोळ कामासाठी गेल्या अकरा वर्षांपासून तिष्ठावे लागत आहे. कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावरील नंदवाळ गावच्या हद्दीतील पंधराहून अधिक जमीनधारकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही व्यथा यातील काहीजणांनी ‘लोकमत’च्या ‘हेल्पलाईन’कडे मांडली.
नंदवाळ गावच्या हद्दीतील सुमारे ८० एकर शेतजमीन १९५६ मध्ये १९ शेतमजूर, माजी सैनिक, वहिवाटदार यांना ही जमीन मिळाली आहे. कागदोपत्री प्रत्येकाचे क्षेत्र आहे, परंतु प्रत्यक्षात मोजणी केल्यावर काही जणांना कागदावरील क्षेत्रापेक्षा कमी जमीन आल्याचे दिसून आले. २००४मध्ये झालेल्या या मोजणीनंतर भूमी अभिलेख कार्यालयाने जागेवर जाऊन हद्दी निश्चित करून त्यानुसार दगड लावून द्यावेत व नकाशा द्यावा, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.
यासंदर्भात अकरा वर्षांपासून वारंवार पाठपुरावाही सुरू आहे. भूमी अभिलेख कार्यालय म्हणते आम्हाला प्रथम करवीर तहसीलदार कार्यालयाकडून जमिनीची कब्जेपट्टी मिळायला हवी तर तहसीलदार कार्यालय म्हणते भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घ्यावी.
दोघांच्याही चालढकलपणामुळे तक्रारदारांना त्रासाला सामोरे जागे लागत आहे. त्यातील एक तक्रारदार असणारे शेतजमीन मालक हे महसूल विभागातील मोठ्या पदावरील निवृत्त कर्मचारी आहेत, असे असूनही पुढील कार्यवाही करण्याचा शिष्टाचार करवीर तहसीलदार कार्यालयाने दाखविलेला नाही (प्रतिनिधी)