चंदगडमध्ये गणपती बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:58+5:302021-09-21T04:26:58+5:30
श्रींची भक्तिमय वातावरणात दहा दिवस पूजा करून, जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. लहान मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ...

चंदगडमध्ये गणपती बाप्पाला निरोप
श्रींची भक्तिमय वातावरणात दहा दिवस पूजा करून, जल्लोषात गणेशोत्सव साजरा झाला. लहान मुलांनी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला. कोरोनाचा काळ असल्यामुळे यंदा प्रशासनासचे नियम पाळावे लागले. कोणताही गाजावाजा न करता यंदा सर्वच सार्वजनिक मंडळासह घरगुती गणपतीचे विसर्जन अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आले.
घटप्रभा व ताम्रपर्णी नदी काठावर कानडी, माणगाव, दुंडगे, मजरे कारवे यांसह अनेक ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी घाट बांधावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. मात्र, प्रशासन त्याकडे कायमच दुर्लक्ष करत आले आहे. दरवर्षी गणेश विसर्जन आले की, हा विषय चर्चेत येतो. नंतर मात्र, प्रशासनाला यांचा विसर पडत आहे. त्यामुळे यंदाही घाट नसल्याने बाप्पाचे विसर्जन करताना खूप अडचणी येत होत्या.
नदीवर बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांसह रेस्क्यू टीम हजर होती.
रविवारी विसर्जनाच्या वेळी चंदगड, माणगाव, मजरे कारवे, अडकूर, कानूर, गवसे, नागणवाडी, शिरगाव, पाटणे, पार्ले, कोदाळी, जंगमहट्टी, तावरेवाडी, मौजे कारवे, यशवंतनगर, तुडये, दाटे, हलकर्णी, धुमडेवाडी, तुर्केवाडी, शिनोळी, देवरवाडी, सातवणे, कानडी, पोवचीवाडी, कानडी, केरवडे, गंधर्वगड, वाळकुळी, शिवणगे, कोवाड, कुदनूर व कालकुंद्रीसह अनेक गावांतील मंडळांनी सार्वजनिक, तसेच घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन केले.
कोरोनाचे विसर्जन व्हावे
गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरानाचा सामना करत आहे. त्यामुळे आता तरी गणरायाने आपल्यासोबत कोरोनाचे विसर्जन करून करावे, जेणेकरून सर्वच गोष्टी पूर्ववत होईल, अशी मागणी यावेळी गणेशभक्तांनी गणरायाकडे केली.
फोटो ओळी : कानडी येथे घटप्रभा नदीला घाट नसल्याने, रविवारी गणेशमूर्ती विसर्जन करताना गणेश भक्तांना अशी कसरत करावी लागली.
क्रमांक : २००९२०२१-गड-०१