फॅन्सीचे फॅड; दुचाकीस्वार मोकाट
By Admin | Updated: July 13, 2015 00:31 IST2015-07-12T23:54:05+5:302015-07-13T00:31:36+5:30
वाहतूक पोलिसांचा कारवाईचा धडाका : सहा महिन्यांत १५७३ वाहनधारकांना १ लाख ५९ हजारांचा दंड

फॅन्सीचे फॅड; दुचाकीस्वार मोकाट
कोल्हापूर : वाहतूक नियंत्रण शाखेने शहरात विविध कारवायांचा धडाका लावला असला तरी कोल्हापूरकरांचे फॅन्सी नंबरचे ‘फॅड’ आजही कायम असल्याचे दिसते. शहरात शनिवारी व रविवारी ‘लोकमत’चे प्रतिनिधी व छायाचित्रकारांनी विविध ठिकाणी फिरून पाहणी केली. विशेषत: तरुण वर्गाच्या डोक्यातून वाहनांना फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड अजूनही गेलेले दिसले नाही. दुसरीकडे, फॅन्सी नंबर प्लेटवर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचे हत्यार उपसले आहे. पोलिसांचे कारवाईचे धाडसत्र सुरू असले तरीही, दुचाकीस्वार बिनधास्तपणे ‘मोकाट’ फिरताना दिसून येत आहेत.
शहरात झालेल्या चेन स्नॅचिंग, चोरी, घरफोडी, आदी प्रकरणांमध्ये दुचाकींचा वापर होताना पोलीस तपासामध्ये स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे चोरी प्रकरणामध्ये विनानंबर प्लेटच्या दुचाकींचा वापर होतो. कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी विनानंबर व फॅन्सी नंबर प्लेट दुचाकी, चारचाकी वाहनांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. १ जानेवारी ते ३० जून २०१५ या कालावधीत वाहनांना विहित नमुन्यात नंबर प्लेट न लावणे अशा एकूण १५७३ प्रकरणांवर कारवाई करून एक लाख ५९ हजार रुपये दंड वसूल केला; तरीही कोल्हापूरकरांचे फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड गेले नसल्याचे दिसते.
शहरात रोज विविध कारवायांचे सत्र सुरू आहे. फॅन्सी नंबर प्लेट व विनानंबर वाहने असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. - आर. आर. पाटील,
पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक
नियंत्रण, शाखा कोल्हापूर.
१) कोल्हापुरातील गंगावेश परिसरात एका दुचाकीस्वाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेली नंबर प्लेट लावलेली होती. २) नंबर प्लेटवर ‘एक सात १३’ लिहून दुचाकीस्वाराने नियमाचा भंग केला आहे. ३) दुचाकीस्वाराने ‘आर’ लिहिलेला आहे की १२ नंबर घातला आहे, हे समजत नाही. त्यामुळे ‘हा नंबर ओळखून दाखवा,’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ४) नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगानेच नंबर घातला जातो. मात्र, या दुचाकीस्वाराने हा नियम धाब्यावर बसवून चक्क लाल रंगाने नंबर घातला आहे. ५) काही तरुणांना आपल्या दुचाकीला केवळ मोकळी नंबर प्लेट लावण्यातच मजा वाटते. ६) ‘मी राजा, मला कोण अडवणार?’ असे तर हा दुचाकीस्वार सांगत नसेल ना?