शिरोळच्या गोविंदांचा नावलौकिक
By Admin | Updated: August 11, 2014 22:42 IST2014-08-11T22:17:12+5:302014-08-11T22:42:01+5:30
तीस वर्षे सातत्य : दहीहंडी फोडण्याची परंपरा

शिरोळच्या गोविंदांचा नावलौकिक
शिरोळ : डॉल्बीचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि गोविंदा आला रे.. आला अशा जल्लोषपूर्ण वातावरणात यंदाही दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळची गोविंदा मंडळे सज्ज झाली आहेत. मानाच्या दहीहंड्या फोडून येथील गोविंदांनी नावलौकिक मिळवला असून गेल्या ३० वर्षापासून दहीहंडी फोडण्याची परंपरा सातत्याने सुरू आहे.
शिस्त, सांघिकपणे लोक चळवळीतून शिरोळच्या ऐतिहासिक नगरीत सन १९८४ सालापासून धनाजी पाटील-नरदेकर यांच्या नेतृत्वाखाली अजिंक्यतारा मित्रमंडळाने दहिहंडी फोडण्याचा उपक्रमास सुरूवात केली. या मंडळाने ५१ रूपये बक्षिसाची पहिली दहीहंडी फोडली. १९८४ पासून प्रत्येकवर्षी गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात या मंडळाने अनेक मानाच्या दहीहंडी फोडल्या आहेत. चित्तथरारक मानवी मनोरे रचत अत्यंत चपळाईने ३५ ते ३८ फूटावरची दहीहंडी फोडण्यात या गोविदांचा वरचष्मा आहे. यामुळेच कोल्हापूरातील गोकुळ दूधसंघ, महाडिक युवामंच, सराफ कट्टा, धान्य व्यापार पेठ, गुजरी तर इचलकरंजीतील वखारभाग, शिरोळमधील संभाजी चौक तसेच इस्लामपूर, पुणे, तासगाव याभागातील मानाच्या दहीहंडी अजिंक्यतारा मंडळाने फोडल्या आहेत.
कालांतराने अजिक्यतारा मंडळाबरोबर जय महाराष्ट्र तरूण मंडळ, हनुमान तालिम मंडळ, गोडीविहीर कोळी गल्ली, बुवाफन मंडळ व पार्वती चौक अशी गोविंदा पथकांची मंडळे तयार झाली. अजिक्यतारा, जय हनुमान, जयमहाराष्ट्र, सम्राट-आगर, कुटवाड ही गोविंदा पथके दहीहंडी फोडून अनेक बक्षिसे मिळवत आहेत. सात थरापर्यंत मनोरे करून यंदाही गोकूळ अष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्यासाठी येथील गोविंदा पथके सज्ज झाली आहेत.
शिरोळच्या गोविंदा पथकांच्या मंडळांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. दहीहंडी फोडण्याचा उपक्रमातून बक्षिस म्हणून जी रक्कम जमा होते. त्यातूनच प्रत्येक वर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. (प्रतिनिधी)
सामाजिक बांधीलकीतून गेली ३० वर्षे दहीहंडी फोडण्याचा उपक्रम आम्ही राबवीत आहोत. या उपक्रमात लहानापासून थोरापर्यंत सर्व जातिधर्मांतील लोक एकत्र येतात. सुमारे पाचशे जणांचे हे पथक असून, दहीहंडी फोडायचीच या ईर्षेने तरूण मानवी मनोरे रचतात. जोखीम पत्करून अनेक प्रयत्नांनंतर दहीहंडी फोडण्यात यश मिळते. न्यायालयाच्या आदेशानुसार मनोरे करणार आहोत.
- धनाजी पाटील-नरदेकर,
अध्यक्ष, अजिंक्यतारा मंडळ.