‘मेड इन कोल्हापूर’ राज्यात फेमस
By Admin | Updated: August 26, 2014 23:56 IST2014-08-26T23:39:28+5:302014-08-26T23:56:15+5:30
गणराजाचे वेध : लालबागचा राजा, पाटील पोटल्या, दगडूशेठ यांना मागणी

‘मेड इन कोल्हापूर’ राज्यात फेमस
कोल्हापूर : यंदा ‘लालबागचा राजा’, ‘पाटील पोटल्या’ आणि ‘दगडूशेठ’ या मूर्तींना मोठी मागणी आहे. पेण (रायगड) येथील मूर्तींपाठोपाठ ‘मेड इन कोल्हापूर’च्या मूर्तीही आता राज्याबरोबरच गोवा, कर्नाटकमध्येही दाखल होण्यास सज्ज झाल्या आहेत.
गणराजाचे आगमन केवळ तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. कुंभारवाड्यात काही मूर्ती रंगकामासह मंडपात जाण्यासाठी सज्ज आहेत, तर काही मूर्तींचे रंगकाम आणि अखेरचा हात मारण्याचे काम सुरू आहे. राज्याबरोबर देशभरात पेण (रायगड) येथील गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. यंदा या मागणीत थोडी घट झाली आहे; कारण कोल्हापुरातील मूर्ती आकर्षक रंगसंगती, सुबक कोरीव काम आणि दणकट असल्याने त्यांना मागणी वाढली आहे.
राज्यात ‘लालबागचा राजा’ या मूर्तीस मोठी मागणी आहे. तशा हुबेहूब मूर्ती कोल्हापुरातही साकार केल्या जात आहेत. त्यामुळे या मूर्तीचा पेटंट असला तरी त्यात किरकोळ बदल करून अनेक मूर्ती कोल्हापुरातील शाहूपुरी, गंगावेश कुंभार गल्ली, जाधववाडी-बापट कँप येथील कुंभारवाडा या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्तींची उंचीही साधारण अकरा फूट इतकी आहे. या मूर्तीबरोबरच सात फुटी पाटील पोटल्या मूर्तींनाही मागणी वाढली आहे. ही मूर्ती केवळ कोल्हापुरातच केली जाते. या मूर्तींना पंढरपूर, सांगोला, सोलापूर व कर्नाटकातील काही भागांत मोठी मागणी आहे. (प्रतिनिधी)
हुबेहूब चित्रात दाखविल्याप्रमाणे मूर्ती बनविण्याचे कसब माजगावकर बंधू, श्रीकांत माजगावकर, सर्जेराव निगवेकर, उदय कुंभार, संतोष खुपेरकर, संदीप वडणगेकर, सागर येळावडेकर, आदी मूर्तिकारांमध्ये आहे.
कोणतेही गणेशाचे चित्र दाखविल्यानंतर ही मंडळी २१ फूट, ११ फूट आणि
७ फूट किंवा सांगाल त्या उंचीप्रमाणे मूर्ती बनवून देतात. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या या वेगळ्या मूर्तींनाही राज्यभरातून मोठी मागणी आहे.
यंदा कच्चा माल महागल्याने वीस टक्क्यांनी मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. मोठ्या मूर्तींना ‘गबाळ गाठ’ म्हणून जे मटेरियल लागते, ते यंदा मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे. प्लास्टरही महागले आहे. साहजिकच मूर्तीही महागल्या आहेत.
- सुरेश गणपतराव माजगावकर, ज्येष्ठ मूर्तिकार, कोल्हापूर