लांडगे कुटुंबीय वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 12, 2014 23:19 IST2014-08-12T23:10:07+5:302014-08-12T23:19:47+5:30

उचगाव येथील साक्षी मृत्यू प्रकरण : शासकीय अधिकाऱ्यांना सोयरसुतक नसल्याचे चित्र

The families of the ladders awaiting justice for a year | लांडगे कुटुंबीय वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

लांडगे कुटुंबीय वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

शिवाजी कोळी - वसगडे ‘महावितरण’च्या हलगर्जीपणामुळे दहा महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या उचगाव (ता. करवीर) येथील साक्षी विजय लांडगे या चिमुकलीच्या नातेवाइकांना अद्याप न्याय मिळालेला नाही. महावितरणच्या कार्यालयापासून पोलीस ठाणे ते गृह सचिवालयापर्यंत शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही अधिकाऱ्यांना माणुसकीचा अजून साधा पाझरही फुटला नसल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे साक्षीच्या कुटुंबीयांना न्याय मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उचगाव येतील वसंत प्लाझाजवळ दुर्देवी साक्षीचे कुटुंबीय राहतात. साक्षी इंदुमती गर्ल्स हायस्कू लमध्ये सातवीच्या वर्गात शिकत होती. ती अत्यंत गोंडस, हसरी स्वभावाची अन् हुशार होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या वडील विजय लांडगे यांचा पानपट्टीचा व्यवसाय असून, १३ आॅक्टोबर २०१३ ची रात्र मात्र लांडगे कुटुंबीयांना ‘काळरूपी’ च ठरली.रात्री पावणेदहाच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर साक्षीची आई अर्चना व आजी मालन लोखडी जिन्यावरून दुसऱ्या मजल्यावर गेल्या. त्यांच्या पाठोपाठ साक्षीही जात असताना जिन्याजवळ असणाऱ्या लोखंडी पाईपला अनवधानाने साक्षीचा हात लागल्यामुळे जीआय वायर हलून खांबाजवळ विद्युतभारित होऊन प्रवाहित झाली. अन् साक्षीला जोराचा झटका बसून ती खाली कोसळली. तिला वाचविण्यासाठी नातेवाइकांनी जिवाचे रान केले; पण काही उपयोग झाला नाही. झालेल्या प्रकारामुळे लांडगे कुटुंबीय पुरते हादरून गेले.
साक्षीच्या मृत्यूला ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्याने विजय लांडगे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात महावितरणच्या विरोधात तक्रार दिली; पण अद्याप त्यांना एफ.आय.आर.ची प्रत पोलिसांनी दिलेली नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विद्युत लोकपाल, विद्युत अभियंता, राज्य मानवाधिकार आयोग, उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री किंबहुना लोकशाही दिनात सुद्धा तक्रार दिली; पण केवळ ‘पोच’ देण्यापलीकडे काहीही कार्यवाही झाली नसल्याचे लांडगे यांचे मत आहे.

महावितरणकडून लांडगे कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी साक्षीचे वडील विजय लांडगे यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल, असे कार्यकारी अभियंता व्ही. एस. माने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

Web Title: The families of the ladders awaiting justice for a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.