सरकी तेलाच्या दरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST2021-01-25T04:26:01+5:302021-01-25T04:26:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेली महिनाभर सरकी तेलाने चांगलीच उसळी घेतली होती, मात्र या आठवड्यात दरात घसरण सुरू ...

सरकी तेलाच्या दरात घसरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेली महिनाभर सरकी तेलाने चांगलीच उसळी घेतली होती, मात्र या आठवड्यात दरात घसरण सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात १२५ रुपये किलोपर्यंत दर आला आहे. साखर, तूरडाळ, हरभरा डाळीचे दरही कमी झाले आहेत. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर काहीसे कमी झाले आहेत. फळ मार्केटमध्ये द्राक्षे, कलिंगडे, माल्टाची रेलचेल दिसते.
ऐन संक्रांतीच्या तोंडावर सरकी तेलाने उसळी घेतली होती. किरकोळ बाजारात १३५ रुपयांपर्यंत दर पोहोचला होता. मात्र या आठवड्यात दर कमी होऊन १२५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साखरेच्या दरात किलोमागे रुपया, तूरडाळीच्या दरात दहा तर हरभरा डाळीच्या दरात पाच रुपयांची घसरण झाली आहे. शाबूही पाच रुपयांनी कमी झाली आहे. लाल मिरचीचे दर कायम असून, ‘ब्याडगी’चा दर ३५० रुपये किलो आहे. संक्रांतीचा सण झाल्याने कडधान्य मार्केटमध्ये काहीसी मंदी दिसत आहे.
स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांचे दर काहीसे कमी झाले आहेत. कोबी, वांगी, घेवडा, गवार, दोडक्याच्या दरात घसरण झाली आहे. टोमॅटाे, ढब्बू, ओला वाटाणा, कारली, भेंडीच्या दरात फारसा चढउतार नाही. कोथिंबीरची आवक वाढल्याने दहा रुपये पेंढीचा दर आहे. हरभरा पेंडीची आवक वाढली असली तरी मागणी कमी असल्याने घाऊक बाजारात २०० रुपये शेकडा दर झाला आहे. मेथी, पोकळा, शेपूच्या दरात मात्र चढउतार दिसत नाही. द्राक्षांची आवक वाढू लागली असली तरी दर मात्र शंभर रुपयांवरच राहिला आहे. हिरव्या पाटीच्या कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. दहा रुपयाला कलिंगडाचा दर आहे. चिक्कू, सफरचंद, अननस, बोरांच्या दरात फारशी चढउतार नाही.
पिवळ्या धमक माल्टाने बाजार फुलला
संत्र्यांची आवक स्थिर असली तरी माल्टाची आवक वाढली आहे. त्यामुळे पिवळ्या धमक माल्टाने बाजार फुलला आहे. किरकोळ बाजारात पन्नास रुपयांना दीड किलो माल्टा मिळत आहे.
फोटो ओळी : कोल्हापुरात फळ मार्केटमध्ये रविवारी द्राक्षांची आवक वाढली असली तरी दर मात्र तेजीतच होते.
(फोटो-२४०१२०२१-कोल-बाजार) (छाया- नसीर अत्तार)