सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहाचे पत्र्यांचे पडले तुकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:18+5:302021-06-20T04:18:18+5:30
कोल्हापूर : विचारेमाळ येथील सामाजिक न्याय भवनासमोरील सभागृहाची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. या स्तूप आकाराच्या इमारतीवरील पत्रे गेल्यावर्षीपासून ...

सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहाचे पत्र्यांचे पडले तुकडे
कोल्हापूर : विचारेमाळ येथील सामाजिक न्याय भवनासमोरील सभागृहाची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. या स्तूप आकाराच्या इमारतीवरील पत्रे गेल्यावर्षीपासून उडून जायला सुरुवात झाली. गेल्या वर्षभरातील वादळामध्ये उरलेले पत्रे उडून या सभागृहाची दुरवस्था झाली आहे. आता तर पावसाळ्यात वरून थेट पाऊसच सभागृहात पडत असल्यामुळे खालच्या खुर्च्याही प्लॅस्टिकच्या कागदाने झाकण्यात आल्या आहेत. फायबरच्या पत्र्याचा कचरा खाली झाला आहे.
दुरूस्तीचा सुधारित प्रस्ताव चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यांना निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू होणार असल्याने पावसाळ्यात सभागृहातील साहित्याची वाट लागणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने २०१० नंतर सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी सामाजिक न्याय भवन अशी स्वतंत्र इमारत आणि त्या समोर बौद्धकालीन स्तुपाच्या आकाराचे भव्य सभागृह बांधण्याची योजना आखण्यात आली. २०१२-१३ मध्ये कोल्हापूर येथील विचारेमाळ येथे कोट्यवधी रुपये खर्चून इमारत आणि सभागृह बांधण्यात आले. त्यामध्ये खुर्च्यासह अन्य साहित्याने हे सुसज्ज करण्यात आले.
नऊ महिन्यांपूर्वी या सभागृहाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नव्याने प्रस्ताव तयार करून पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून दुरूस्तीचे अंदाजपत्रक प्रक्रिया झाल्यानंतर मग निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र तोपर्यंत बाहेरून देखील या सभागृहाकडे पाहिल्यानंतर त्याची रया गेल्याचे स्पष्ट होते.
कोट
या सभागृहाच्या दुरूस्तीचा नवीन प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये सांची स्तूपाची प्रतिकृती उभारण्यापासून अन्य काही बाबींचा समावेश आहे. हा प्रस्ताव मंजूर होवून, निधी उपलब्ध झाल्यानंतर तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
विशाल लोंढे
सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग
१९०६२०२१ कोल सामाजिक भवन ०१।०२।०३।०४
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय भवनाच्या कोल्हापुरातील विचारे माळ येथील इमारतीसमोरील सभागृहावरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळे पावसाचे पाणी थेट सभागृहात पडत असल्याने या सभागृहाची दुरवस्था होत आहे. छाया आदित्य वेल्हाळ