फकिराचा खून आर्थिक व्यवहारातून

By Admin | Updated: July 1, 2016 23:42 IST2016-07-01T22:32:11+5:302016-07-01T23:42:02+5:30

जमलेल्या ८0 हजारांतून हा वाद होत होता. त्यामुळे एक वर्षापूर्वी रिझवानने सैफुल्लावर कर्नाटक येथील कुमठा येथे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता.

Fakir's murder through financial transactions | फकिराचा खून आर्थिक व्यवहारातून

फकिराचा खून आर्थिक व्यवहारातून

रत्नागिरी : भीक मागून जमवलेल्या पैशाच्या वाटपावरूनच सैफुल्ला याचा रिझवान शेख याने गोळ्या घालून निर्घृण खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. कोल्हापूर शहरातील राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका भिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातही रिझवानचा हात असण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पत्रकार परिषदेत दिली.सैफुल्ला आणि रिझवान हे गेली १२ वर्षे एकत्र भीक मागून राहत होते. परंतु गेली दोन वर्षे भीक मागून जमवलेल्या पैशाच्या वाटपावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. त्यांच्याकडे जमलेल्या ८0 हजारांतून हा वाद होत होता. त्यामुळे एक वर्षापूर्वी रिझवानने सैफुल्लावर कर्नाटक येथील कुमठा येथे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता. परंतु, त्यामध्ये सैफुल्ला बचावला होता. तेव्हापासून रिझवान त्याच्यावर पाळत ठेवून होता.
रिझवान तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीत दाखल झाला होता. या अगोदरही तो रत्नागिरीत असल्याने त्याला रत्नागिरीतील रस्त्यांची माहिती होती. २९ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याचा सुमारास सैफुल्ला जेवण करण्यासाठी पऱ्याची आळी परिसरातून जात असताना रिझवान बुरखा घालून तेथे गेला आणि त्याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडून सैफुल्लावर प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये सैफुल्ला ठार झाला.
रत्नागिरीची सर्व माहिती असल्याने तेथून पळ काढण्यात रिझवान यशस्वी झाला. पोलिसांना चकवा देत तो चालत पावस येथे गेला. तेथून त्याने राजापूर गाठले. परंतु रत्नागिरी शहर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोबाईल नंबरच्या आधारे रिझवानचा शोध घेऊन त्याला राजापूर जकात नाका येथे अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, ३ जिवंत काडतुसे, रोख पाच हजार रूपये, मोबाईल हॅण्डसेट, बुरखा जप्त केल्याची माहिती प्रणय अशोक यांनी दिली.
याअगोदर कोल्हापूर शहरामध्ये राजवाडा पोलीस ठाण्याचा हद्दीत एका भिकाऱ्याचा गोळी घालून खून झाला होता. त्यामध्येही रिझवानचा हात असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्या दुष्टीने पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी रिझवानला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, मारूती जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनित चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय जाधव, सुशील पंडीत, संदीप कोळंबेकर, विष्णू नागले, राकेश बागुल, दिनेश आखाडे, उदय वाजे, प्रवीण बर्गे, ससंदीप काशिद, रमीज शेख, संदीप मालप, विजय आंबेकर यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)

आरोपी रिझवान शेख याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी समोर येऊन तपासकामी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Fakir's murder through financial transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.