विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:00 IST2018-08-13T01:00:09+5:302018-08-13T01:00:13+5:30

Failure to cancel the windfall | विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

विमानफेरी रद्दचा आमदारांना फटका

कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई विमानफेरी एअर डेक्कन कंपनीने रविवारी रद्द केली. त्याचा फटका आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना बसला. ऐनवेळी विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना वाहनाने प्रवास करावा लागला.
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने १७ एप्रिलपासून सुरू केली. या सेवेला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तांत्रिक कारणामुळे २६ जूनपासून उड्डाणे रद्द केली. विमानसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन कंपनी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर २९ जुलैपासून पुन्हा या कंपनीकडून ‘कोल्हापूर-मुंबई’ विमानसेवा सुरू झाली. त्यानंतर ही विमानसेवा सुरळीतपणे सुरू राहिली. मात्र, रविवारी तांत्रिक कारणामुळे या मार्गावरील विमानफेरी कंपनीने रद्द केली. या विमानातून मुंबईहून कोल्हापूरकडे आमदार डॉ. सुजित मिणचेकर येणार होते, तर कोल्हापुरातून आमदार राजेश क्षीरसागर हे मुंबईला जाणार होते. पण, विमानफेरी रद्द झाल्याने त्यांना ऐनवेळी वाहनाने प्रवास करावा लागला.
विमानफेरी रद्दबाबतच्या कंपनीच्या निर्णयाबद्दल त्यांच्या अन्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान याबाबत ‘एअर डेक्कन’ची भूमिका जाणून घेण्यासाठी कंपनीचे कोल्हापुरातील व्यवस्थापक नंदकुमार गुरव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.

Web Title: Failure to cancel the windfall