पुलाअभावी १५ कि.मी.चा फेरा
By Admin | Updated: November 27, 2015 01:03 IST2015-11-27T00:45:01+5:302015-11-27T01:03:18+5:30
गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी : भोगावती नदीवरील नवीन पुलाचा प्रस्ताव ६० वर्षे लालफितीत

पुलाअभावी १५ कि.मी.चा फेरा
सडोली खालसा : करवीर तालुक्यातील गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी दरम्यान भोगावती नदीपात्रात नवीन पुलाचा प्रस्ताव तब्बल ६० वर्षे अडगळीत पडला आहे. यामुळे करवीर पश्चिम भागासह राधानगरी तालुक्यातील जनतेला १५ किलोमीटर लांब पल्ल्याने प्रवास करावा लागत आहे. पूल झाला नसल्यामुळे दोन्ही तालुक्यांतील गावांचा दळण-वळणाचा प्रश्न स्वातंत्र्यकाळापासून रेंगाळला आहे. करवीर तालुक्याचा पूर्व भाग व पश्चिम भाग असे दोन भाग पडले आहे. तालुक्याचा पूर्व भाग हा कोल्हापूर शहराच्या जवळ असल्यामुळे या भागात रस्ते व सुखसोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु पश्चिम भागातील गावांना कोल्हापूर शहरात जाण्यासाठी हळदीमार्गे ३५ ते ४० किलोमीटर, तर बीडमार्गे ४० ते ४५ किलोमीटर अंतर आहे. जादा अंतर होत असल्यामुळे करवीर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावे शहरापासून दुरावत आहेत. यासाठी गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथे भोगावती नदीवर पूल व बंधारा शासनाने मंजूर केल्यास हेच अंतर १५ ते २० किलोमीटर होईल. त्यामुळे या अतिदुर्गम भागाचा निश्चितच विकास व्हायला वेळ लागणार नाही. गोवा-राधानगरी-करवीर या पश्चिम भागातील प्रवासाचे १५ ते २० किलोमीटर अंतर कमी होणार असून वेळ, इंधन, पैसा यांची बचत होणार आहे.करवीरच्या पश्चिम भागातील व राधानगरीच्या मुख्य वाहतुकीच्या सोयीचा असणारा आरे-पिरळ हा रस्ता गाडेगोंडवाडी गावामधून गेला आहे. या रस्त्यावरून राधानगरीकडे जाण्यासाठी गगनबावडा, रत्नागिरीहून येणारी वाहतूक कोल्हापूरकडे न जाता कुडित्रे-सावरवाडी-आरे मार्गे राधानगरीकडे बायपास मार्गाने होते. गाडेगोंडवाडी परिसरातील नदीपात्र खोल असल्यामुळे येथे पुराचे पाणी जास्त पसरत नाही. पूर आला तरी कोल्हापूर-राधानगरी-गोवा वाहतूक सुरू राहून कोल्हापूर शहराचा संपर्क तुटणार नाही.
या पुलाची गरज ओळखून आरे ग्रामपंचायतीने करवीर व राधानगरी तालुक्यांतील प्रवाशांच्या मागणीनुसार गाडेगोंडवाडी येथे पूल व्हावा, या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, परंतु आमदार व खासदारांची इच्छाशक्ती नसल्यामुळे हा प्रस्ताव गेल्या ६० वर्षांपासून शासनाकडे धूळ खात पडला आहे.
नेत्यांचे आश्वासन हवेतच
जुन्या पिढीतील १९३० ते १९७५ पर्यंत गाडेगोंडवाडी येथून होडीतून व दगडी बंधाऱ्यावरून राधानगरी व करवीर तालुक्यांतील नागरिक तांदूळ, शेणी, गूळ विक्री करण्यासाठी कोल्हापूर शहराकडे जात होते. त्यावेळीपासून भोगावती नदीवर पूल बांधावा, अशी मागणी प्रवाशांतून होत होती; परंतु निवडणुकीपुरतीच नेतेमंडळी आश्वासन देऊन या परिसरातील जनतेची दिशाभूल करतात. निवडणुकीनंतर ही आश्वासने हवेत विरतात.
स्वातंत्र्यापासून गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी हा पूल व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून, गाडेगोंडवाडी पश्चिम भागाचा रोजगार, उद्योग आणि शहर जवळ यावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
- निवृत्ती मेटील, सरपंच, ग्रामपंचायत, गाडेगोंडवाडी