फडणवीस-पवार यांच्यात गुफ्तगू
By Admin | Updated: August 12, 2014 23:17 IST2014-08-12T22:53:52+5:302014-08-12T23:17:29+5:30
खासदार संजय पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर व जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानी जाणे टाळले

फडणवीस-पवार यांच्यात गुफ्तगू
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व आमदार संभाजी पवार यांच्यात मंगळवारी अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. अन्य पक्षांतील नेत्यांना पक्षात घेताना जुन्या लोकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते. अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवारांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
जुना बुधगाव रस्त्यावरील पवारांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सांगलीतील माळी समाजाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर फडणवीस पवारांशी चर्चा करण्यासाठी गेले. अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली होती. अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांबाबत निर्णय घेताना स्थानिक जुन्या लोकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी पवारांनी केली. असे निर्णय होताना जुने कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असते. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक लोकांना याबाबतची कल्पना द्यावी व त्यांचेही मत जाणून घ्यावे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अन्य कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सांगितले. सांगली दौऱ्यात फडणवीसांसोबत असणारे पदाधिकारी पवारांसोबतच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. खासदार संजय पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर व जिल्ह्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानी जाणे टाळले. पवारांविरोधातील गटाला या अचानक ठरलेल्या भेटीबाबतही आश्चर्य वाटले. यावरून आता भाजपअंतर्गत राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. (प्रतिनिधी)