मंंदिर परिसरात सुविधांची वाणवा
By Admin | Updated: February 7, 2015 00:05 IST2015-02-07T00:02:24+5:302015-02-07T00:05:27+5:30
पर्यटकांची गैरसोय : मंदिराला अतिक्रमणाचा विळखा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव

मंंदिर परिसरात सुविधांची वाणवा
कोल्हापूर : ‘शहराचे हृदय’ म्हणून ज्या प्रभागाची ओळख सांगता येईल त्या महालक्ष्मी मंदिर प्रभागात सध्या सगळ््यात मोठा प्रश्न आहे तो येथे येणाऱ्या भाविकांना न मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांचा. महापालिकेकडील निधीची कमतरता आणि शासनपातळीवर मंदिराच्या विकासाबाबतची उदासीनता, ठेकेदारांची अनुपलब्धता यामुळे परिसरात स्वच्छतागृहे नाहीत. महाद्वार रोड, जोतिबा रोडसारख्या रस्त्यांची चाळण झाली आहे. महालक्ष्मी मंदिर या प्रभागात बालगोपाल तालीम, शेषनारायण मंदिर, बाबूजमाल दर्गा परिसर, गंगावेश, अर्बन बँकेची मागील बाजू, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, भेंडे गल्ली, कासार गल्ली, महादेव गल्ली, परीट गल्ली असा भरवस्तीचा परिसर येतो. साधारण साडेसहा हजार लोकवस्ती असलेल्या या प्रभागाचे गेली १५ वर्षे परमार कुटुंबीय नेतृत्व करत आहेत. सध्या रणजित परमार हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या पत्नी नयना परमार व भाऊ ईश्वर परमार यांनी देखील या प्रभागाचे नगरसेवकपद पाहिले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा परमार कुटुंबावर विश्वास आहे. मध्यवस्ती परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. रहिवासी तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्गदेखील आहे. व्यापारीवर्गापेक्षा रहिवासी वस्तीतील नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे अधिक लक्ष पुरविण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याचा, ड्रेनेजचा किंवा गटारींचा प्रश्न नाही, कारण ही कामे झाली आहेत. येथे प्रश्न येतो तो रस्त्यांचा आणि बाहेरील भाविकांच्या सोयी-सुविधांचा. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराभोवती अतिक्रमणांना विळखा असून त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागतो. पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे नाहीत, घाटी दरवाजा परिसरात अस्वच्छता, इंदुमती गर्ल्स हायस्कूलसमोर असणाऱ्या स्वच्छतागृहांची अवस्था वाईट झाली आहे, हे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. अंबाबाईचा रथोत्सव, नगरप्रदक्षिणा हेच अडथळे पार करत निघते.
मात्र, मंदिराशी निगडित विषय महापालिकेच्या मुख्य प्रशासन पातळीवर होत असल्याने नगरसेवकांना त्यात फारसा वाव नाही. महापालिका पातळीवर या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, शिवाय ठेकेदारांमधील उदासीनतेमुळे मंजूर झालेली कामेही रखडली आहेत. मंजूर कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहेत.
कोणतेही पद नसताना केलेल्या कामांमुळे गेली १५ वर्षे नागरिकांनी परमार कुटुंबावर विश्वास टाकला आहे. प्रभागात अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा नाहीत. त्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत, मात्र ठेकेदारांमध्ये उदासीनता असल्याने काम रखडले आहे.
- रणजित परमार (नगरसेवक)