गगनबावडा परिसरात सुविधांची वानवा

By Admin | Updated: July 8, 2016 01:01 IST2016-07-08T00:04:18+5:302016-07-08T01:01:24+5:30

पर्यटकांतून नाराजी : ग्रामपंचायतीसह सर्वच शासकीय विभागांचे दुर्लक्ष; स्वच्छतागृह, पाणपोईची सोय नाही

Facilities in Gaganbavada area | गगनबावडा परिसरात सुविधांची वानवा

गगनबावडा परिसरात सुविधांची वानवा

चंद्रकांत पाटील -- गगनबावडा --हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, विश्वगौरव विभूषित प.पू. स्वामी गगनगिरी महाराजांच्या तप साधनेने पुनीत झालेली आणि हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्यांची जहाँगीर म्हणून आपला इतिहास चिरंतन ठेवणारा ‘गगनबावडा’ हे नाव खूप मोठे असले तरी गाव छोटे आहे.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या असंख्य पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. किल्ले गगनगड, कुंभी मध्यम प्रकल्प, पाचव्या शतकातील सांगशी शिलालेख, मोरजाई देवीचे पठार, पळसंबे येथील पांडवकालीन लेणी, वेसरफ, अणदूर व कोदे येथील धरणे, वेतवडे येथील कुंभी-सरस्वतीचा संगम, करूळ व भुईबावडा घाटरस्ते, किल्ले गगनगड या ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक महत्त्व असणाऱ्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे.
मात्र, दिशादर्शक फलक नसल्याने गैरसोय होत असून, गगनबावडा गावात कुठून जायचे, कसे, असा प्रश्न विचारावा लागतो हे दुर्दैव आहे. गगनबावडा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या दहा वर्षांत एकदाही खड्ड्यांना मुलामा द्यावा, असा विचार करावासा वाटला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
शेकडो वाहनधारक ज्या चौकात आपली वाहने थांबवून विसावा घेण्याबरोबरच स्थानिक तरुणांच्या अर्थप्राप्तीसाठी हातभार लावतात, हा चौक राजकीयदृष्टीने विविध संघटनांची मालकी असणारे ठिकाण बनला आहे. मात्र, आजूबाजूला असणारे खड्डे, कचरा, दगडधोंडे
आणि धुळीच्या साम्राज्यापासून समस्यांकडे सर्वांनीच सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.


गटातटाच्या राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या अधिकारांचा वापर प्राधान्याने विकासकामांसाठी करणे अपेक्षित आहे. येथील ग्रामपंचायतीने येथील संस्थांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.


भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी
साळवण : आकाशाला गवसणी घालणारे व हिरवाईने बहरलेले डोंगरमाथे, धुक्यांच्या लपंडावात रंगलेली पर्वतश्रेणी, त्यातून फेसाळत झेपावणारे शुभ्र झरे आणि अधूनमधून कोसळणाऱ्या सरी असे मनाला भुरळ घालणारे निसर्गरम्य वातावरण गगनबावड्यात सर्वत्र रुंजी घालत असून, याचा आस्वाद घेत चिंब भिजण्यासाठी गगनबावडा पर्यटकांना साद घालतो आहे.
कोल्हापुरातन कोकणाकडे जाणारा प्रमुख घाट मार्ग म्हणजे करूळघाट. याची सुरुवात गगनबावड्यातून होते. प्रती महाबळेश्वर आणि महाराष्ट्राची चेरापुंजी अशीच याची ख्याती आहे. राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद येथेच होते. यामुळे पावसाळ्यात जणू येथे स्वर्गच अवतरतो. निसर्गाच्या मुक्त उधळणीने दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा. त्यात दिसणारे स्वच्छ, सुंदर कोकण, अनेक कड्यांवरून कोसळणारे धबधबे, काही रस्त्याजवळ तर काही दूर पर्वतांच्या अंगा-खांद्यावरून फेसाळत दरीत लुप्त होणारे, असे विहंगम दृश्य टिपण्यासाठी गगनबावड्यातून यु वळणावर येताच पर्यटकांचे पाय थबकतात आणि मन प्रफुल्लित होते.
गेले काही दिवस कोसळणाऱ्या धो-धो पावसाने घाटाचे रूपच पालटले असून, सर्वत्र हिरवागार शालू पांघरल्याचा भास होतो. हवेत तरंगणाऱ्या धुक्यांची दुलई, सोसाट्याचा वारा, टपोरा आणि मधूनच कोसळणारा धो-धो पाऊस या साऱ्या गोष्टी मनाला आल्हाददायक आहेत, तर घाटातून दिसणारे गगनगडाचे दृश्य सर्वांच्यावर अमृताचे शिंपण करीत उभे आहे. त्यामुळे येणारा पर्यटक येथे नतमस्तक होतो. भिरभिरणाऱ्या वाऱ्यात पळणारी धुकं, त्यांचा स्पर्श मनाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो.

Web Title: Facilities in Gaganbavada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.