सभ्यतेच्या बुरख्याआड पुरुषी चेहरा

By Admin | Updated: January 21, 2015 23:55 IST2015-01-21T23:06:48+5:302015-01-21T23:55:59+5:30

मेसमधील कारनामे : जेवताना भिरभिरते नजर; चोरट्या स्पर्शासाठी प्रयत्न--रात्र ‘ति’च्या वैऱ्याची...

The face of civilization and men's face | सभ्यतेच्या बुरख्याआड पुरुषी चेहरा

सभ्यतेच्या बुरख्याआड पुरुषी चेहरा

सातारा : नोकरीनिमित्तानं एकटे राहणारे पुरुष मेसमध्ये जेवायला जातात. चांगल्या नोकरीनं दिलेला सभ्यतेचा बुरखा त्यांच्या चेहऱ्यावर असतो; मात्र त्याच्याआडचा चेहरा अस्सल पुरुषीच असतो, असा मेसचालक महिलांचा अनुभव आहे.
अल्प उत्पन्नगटातील अनेक महिला पतीला हातभार म्हणून मेसचा व्यवसाय करतात. अंगभूत कौशल्यच या व्यवसायात उपयुक्त ठरत असल्याने महिलांचा कल मेसकडे असतो. महाविद्यालयांच्या आसपास राहणाऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय असला, तरी अशा महिलांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. नोकरदार असो वा विद्यार्थी, जेवताना वाढणारी ‘स्त्री’ आहे, हे विसरत नाही. सभ्यतेचा आव आणून खाली मान घालून जेवणारा माणूसही आडून-आडून चोरटे कटाक्ष टाकतोच, हे मेसचालिका आवर्जून सांगतात. वाढताना चोरटा स्पर्श कसा होईल, याचीही अनेकजण खबरदारी घेतात.मोठ्या खानावळींमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही स्वयंपाक पूर्ण झाल्यावर रात्री उशिरा घरी जाताना पुरुषी नजरांचा, छेडछाडीचा सामना करावा लागतो. बहुतांश महिला घरातील पुरुषांना रात्री न्यायला बोलावतात, असे ‘लोकमत टीम’ला आढळून आले. (प्रतिनिधी)

जेवण वाढताना टोचतात नजरा
‘मेसमध्ये जेवायला जाणारे पुरुष मेसमध्ये उघड-उघड असभ्य वर्तन करीत नाहीत. चांगल्या ठिकाणी नोकरीला असलेले; मात्र नोकरीनिमित्त एकटं राहावं लागलेले पुरुष मेसमध्ये जेवतात, तेव्हा आपली प्रतिष्ठा जपली जाईल, असं त्यांचं वर्तन असतं. वरवर पाहता कुणाला संशयही येणार नाही, इतक्या विनम्रतेनं ते वागत असतात. परंतु मेसचालक महिला किंवा तिच्या घरातील मुलगी वाढायला आली, तर तिला त्याची नजर टोचल्याखेरीज राहत नाही. वाढताना कारण काढून सहेतुक स्पर्श होईल आणि चुकून झाला असं वाटेल, याची काळजी घेतानाच अनेकजण पोटाबरोबरच डोळ्याची भूक शमवत असतात.

रात्रीच्या वेळी काम संपवून घरी जाताना पुरुषांच्या वक्री नजरांचा त्रास होतो. अगदी फर्लांगभर अंतरावर घर असलं तरी काम संपल्यावर पती किंवा मुलगा यांना बोलावल्याशिवाय घरी जाता येत नाही.
- शांताबाई चव्हाण, गोडोली

माझ्या घरात माझी तरुण मुलगी आहे. मेसला जेवायला येणाऱ्यांचा इतर ठिकाणचा अनुभव लक्षात घेता मी आता मेस जवळजवळ बंदच केली असून, ज्यांना आमच्याकडेच मेस लावायची आहे त्यांना घरपोच डबे देणे पसंत केले आहे.
- उषा जाधव, मेसचालक, सातारा

Web Title: The face of civilization and men's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.