बदलीपात्र पोलिसांच्या नजरा आता शासनाच्या नव्या आदेशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:39+5:302021-07-05T04:15:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे पोलीस बदल्यांना दिलेली स्थगितीची मुदत दि. ३० जून रोजी संपली, त्यामुळे नवीन ...

बदलीपात्र पोलिसांच्या नजरा आता शासनाच्या नव्या आदेशाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे पोलीस बदल्यांना दिलेली स्थगितीची मुदत दि. ३० जून रोजी संपली, त्यामुळे नवीन येणाऱ्या आदेशाकडे बदलीपात्र पोलिसांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. येत्या आठवड्यात बदल्यांचे गॅझेट निघण्याची शक्यता पोलीस वर्तुळात वर्तवली जात आहे. बदल्याबाबत माहिती तयार असून शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचे नवे आदेश काय निघतात, त्यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील सुमारे ३८० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येत आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या ३३ पोलीस अधिकाऱ्यांचा बदल्यात समावेश आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षीही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. यंदाही पोलीस बदल्यांच्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी राज्यातील सर्वच विभागातील बदल्यांना स्थगितीचा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासनाने दिला. त्याच सायंकाळी पोलिसांच्या बदल्यांनाही दि. ३० जूनपर्यंत स्थगितीचा स्वतंत्र आदेश निघाला. पोलीस दलातील शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील बदलीपात्र अंमलदारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झालेली आहे. त्यानुसार ३८० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या तर विनंती बदल्यांचेही अर्ज आलेले आहेत. जिल्ह्यात चार वर्षे व परिक्षेत्रात आठ वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या ३३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. त्यापैकी ५ पोलीस निरीक्षक, ३ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर व कोल्हापूर परिक्षेत्राबाहेर होत आहेत.
बदल्यांची मार्गदर्शक सूचना
विहित कालावधी पूर्ण झालेले, विहित कालावधी पूर्ण नाही पण मुदतपूर्व बदलीसाठी सादर केलेली लेखी विनंती व प्रतिकूल अहवालावरून करावयाची बदली या तीन प्रकारे बदल्या होत आहेत. बदलीपात्र अंमलदारांकडून माहिती मागविताना त्यांचे तीन पसंतीक्रम मागविले. बदलीवर नेमणूक देताना त्याच्या पसंतीक्रमानुसार तसेच पूर्वीच्या घटकास झालेला कालावधी विचारात घेऊन त्यांना पहिला पसंतीक्रम देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
दोन वादग्रस्त प्रभारी अधिकाऱ्यांची उचलबांगडी
शहरातील चारही पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याचे संकेत आहेत. काहींचा कालावधी पूर्ण झाला आहे, तर दोन प्रभारी अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झाला नसला तरीही वादग्रस्त असल्याने त्यांच्यावर बदलीची कुऱ्हाड लटकत आहे. जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यातही प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत.
कोट...
पोलिसांच्या बदल्यांसाठी शासनाने ३० जूनपर्यत दिलेली स्थगितीची मुदत संपली आहे. बदल्यांची माहिती तयार आहे. शासनाचा नवीन आदेश येताच प्रथम वरिष्ठ स्तरावरील व त्यानंतर जिल्हास्तरावरील पोलिसांच्या बदल्यांची कार्यवाही होईल. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.