डोळं पुसावं की नाक झाकावं...

By Admin | Updated: August 17, 2014 22:32 IST2014-08-17T21:39:44+5:302014-08-17T22:32:49+5:30

मलकापूर : दुर्गंधीमुळे नातेवाइकांना भोगाव्या लागतात नरकयातना-स्मशानभूमीच्या मरणयातना...

Eye nose should be covered with nose ... | डोळं पुसावं की नाक झाकावं...

डोळं पुसावं की नाक झाकावं...

माणिक डोंगरे - मलकापूर  -नवनवीन प्रकल्प यशस्वीपणे राबवणाऱ्या मलकापूर शहाराच्या स्मशानभूमीला मात्र कचरा डेपोमुळे दुर्गंधीचे ग्रहण लागले आहे़ स्मशानभूमीतच कचऱ्याचा डोंगर तयार झाल्यामुळे अंत्यविधीवेळी नातेवाइकांना तोंड बांधूनच अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नाही़
मलकापूर शहराची सुमारे ३५ हजार लोकसंख्या आहे़ महामार्ग पूर्व व जुने गावठाण परिसरासाठी एकाच स्मशानभूमीचा वापर केला जातो़ आगाशिवनगर व शास्त्रीनगर पूर्व व पश्चिम भागाला कऱ्हाड शहराच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी चार किलोमीटर जावे लागते़ या दोन्ही विभागाची स्मशानभूमीची व्यथा अनेक वर्षांपासूनची आहे़
शहराचा प्रतिदिन किमान १० ते १२ टन कचरा गोळा होतो़ नगरपंचायतीने परिसरातील सर्व विहिरी मुजवून कचऱ्याची विल्हेवाट लावली़ दोन वर्षांपासून स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेतच कचरा टाकला जातो़ प्रतिदिन गोळा होणारा कचरा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे कचऱ्याचा डोंगरच तयार झाला आहे़
ओला व सुका कचरा एकत्रच असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे़ ७० टक्के नागरिक अंत्यविधीसाठी कऱ्हाड शहराच्या स्मशानभूमीत जातात. मात्र मलकापूर जुने गावठाण व महामार्गाच्या पूर्वेकडील नागरिकांना अशा जीवघेण्या घाणीतच अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नाही़
नगरपंचायतीच्या वतीने जुन्या स्मशानभूमीच्या पूर्वेस नवीन स्मशानभूमीचे काम हाती घेतले आहे़ ते काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे आणि दुर्गंधीच्या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़
माशांचा उपद्रव, आरोग्य धोक्यात
परिसरात ओल्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होत आहे़ जुन्या गावठाणासह आसपासच्या कॉलन्यांमध्ये एखादे मोहोळ उठावे, असा माश्यांचा उपद्रव वाढला आहे़ यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़
पन्नास कुत्र्यांचा कळप
स्मशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाखाली सडके अन्न व मृत प्राणी असल्यामुळे ते खाण्यासाठी परिसरात ५० ते ६० कुत्र्यांचा कळपच वावरत असतो़ या कळपातील काही कुत्री हिंस्त्र बनली आहेत़ परिसरातून जाणाऱ्या लहान मुलांवर त्यांच्याकडून हल्ला केला जातो.

Web Title: Eye nose should be covered with nose ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.