अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईन
By Admin | Updated: July 12, 2014 00:42 IST2014-07-12T00:38:46+5:302014-07-12T00:42:39+5:30
राजेंद्र दर्डा यांचा निर्णय : रसाळे यांची माहिती

अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईन
कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या पण, समायोजन न झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईन काढण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पटसंख्येचे निकष पूर्ण न झाल्याने राज्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले होते. पण, शासनाकडून त्यांचे समायोजन झाले नसल्याने व शालार्थ वेतनप्रणालीमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याची सुविधा नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले नव्हते. वेतन नसल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत असल्याने संघटनेतर्फे राज्यात धरणे, हलगीनाद आंदोलन करण्यात आले.
तसेच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आयुक्त चोकलिंगम, सचिव अश्विनी भिडे व शिक्षण संचालक महावीर माने यांची भेट घेऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी तत्त्वत: मागणी मान्य केली. त्यानंतर मुंबईत आज, शुक्रवारी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षण विभागाचे आयुक्त, सचिव आणि शिक्षण संचालक यांची बैठक घेतली. यात त्यांनी संबंधित अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील तीन महिने वेतन आॅफलाईनपणे काढण्याच्या सूचना मंत्री दर्डा यांनी दिल्या. या निर्णयामुळे राज्यातील खासगी प्राथमिक शाळांतील ३ हजार ५०० आणि २ हजार ६०० शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ६ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजनही करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक माने यांनी सांगितले आहे. आॅफलाईन वेतन अदा करण्याच्या निर्णयाचे संघटनेतर्फे स्वागत करत असून या निर्णयाबद्दल मंत्री दर्डा यांचे अभिनंदन केल्याचे रसाळे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)