पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी भरघोस निधी
By Admin | Updated: August 26, 2014 00:26 IST2014-08-26T00:26:58+5:302014-08-26T00:26:58+5:30
उमा भारती : गंगेच्या धर्तीवर धनंजय महाडिक यांचे साकडे

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी भरघोस निधी
कोल्हापूर : गंगा नदी स्वच्छता मोहिमेच्या धर्तीवर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन आज, सोमवारी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांना दिले. याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी स्वतंत्र योजना राबविण्याचे आदेश देत उमा भारती यांनी भरघोस निधी देऊ, अशी ग्वाही दिल्याची माहिती महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक, औद्योगिक स्थान असणारे शहर आहे. अंबाबाईचे वास्तव्य असलेले हे शहर ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश आहे. गंगा नदी स्वच्छतेच्या धर्तीवर पंचगंगा शुद्धिकरणाची मोहीम आखण्याची मागणी महाडिक यांनी केली.
पंचगंगेच्या काठावर अनेक मंदिरे आहेत. धार्मिक व प्राचीन संस्कृतीचे जतन, पर्यटनाला चालना मिळावी, नदीकाठाच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटावा, यासाठी भरघोस निधीसह ठोस उपाययोजनांची मागणी महाडिकांनी केल्याचे पत्रकात म्हटले.