महापालिका निवडणुकीपूर्वीच हद्दवाढ
By Admin | Updated: May 25, 2015 00:25 IST2015-05-24T23:41:39+5:302015-05-25T00:25:11+5:30
शासन अनुकूल : महापालिकेस तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

महापालिका निवडणुकीपूर्वीच हद्दवाढ
कोल्हापूर : कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. प्रशासनाकडून हद्दवाढीचा नवा प्रस्ताव आल्यास महापालिका निवडणुकीपूर्वी त्याला तत्काळ मंजूर देऊ, असे ठोस संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.राजकीय कारणास्तव होणाऱ्या विरोधामुळेच शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारण्यात येत असल्याचे पत्र राज्य शासनाने दोन महिन्यांपूर्वीच महापालिका प्रशासनास पाठविले होते. राज्य शासनाने हद्दवाढ नाकारली तरीही आयुक्त पी. शिवशंकर यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने तयार करण्यास सुरुवात केली. शहरालगत असणाऱ्या एक ते दोन किलोमीटर परिघातील गावांचे सर्वेक्षण प्रशासनाने पूर्ण केले आहे. या गावांतील प्रमुख राजकीय व्यक्तींची व्यापक बैठक घेऊन हद्दवाढीचे फायदे महापालिका प्रशासन समजावून सांगणार आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीस हिरवा कंदील दाखविल्याने प्रशासनाच्या या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.
महापालिका प्रशासनावर अवलंबून असणाऱ्या गावांचाच पहिल्या टप्प्यात शहरात समावेश केला जाणार आहे. शहरालगतच्या ज्या गावांत महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, अग्निशमन, के.एम.टी., आदी सेवांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला जातो, यासह या गावांतील अर्थकारण तसेच शेतीवर अवलंबून असणारी लोकसंख्या यांची शास्त्रीय पद्धतीने माहिती संकलन करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. लवकरच हा अहवाल राज्य शासनाला सादर करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.
केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ या योजनेंतर्गत देशातील १०० शहरांचा विकास केला जाणार आहे. या योजनेत राज्यातील तब्बल दहा शहरांचा समावेश होणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी मोठ्या शहरांनंतर कोल्हापूर हे सर्वांत वेगाने वाढणारे शहर आहे. मात्र, आतापर्यंत शहराची एक इंचानेही हद्दवाढ न झाल्याने शहराच्या भौतिक वाढीवर मोठ्या मर्यादा पडल्या आहेत. स्मार्ट सिटी संकल्पनेची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होताच, या योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. स्मार्ट सिटीसाठी लोकसंख्या हा महत्त्वाचा निकष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकसंख्येच्या मानाने मोठ्या आठ ते दहा गावांना विश्वासात घेऊनच राज्य शासनास लवकरच हद्दवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. हद्दवाढीचा प्रश्न निकाली काढून निवडणुका ‘कॅश’ करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली असल्याची चर्चा आहे.
आमचे सरकार कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या विरोधात नाही. तांत्रिक कारणास्तवच हद्दवाढ नाकारल्याचे पत्र दिले असावे. महापालिका प्रशासनाने हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव पाठविल्यास महापालिका निवडणुकीपूर्वीच निर्णय घेऊ.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
नव्या प्रस्तावातील संभाव्य गावे
कळंबा, उचगाव, पाचगाव, मोरेवाडी-कंदलगाव, गांधीनगर, मुडशिंगी, वळिवडे, चिंंचवाड, वसगडे.